शेकोटीच्या आगीने पाच वर्षं जुना मोर्टार फुटला, एका जवानाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान येथील जैसलमेर येथे हिंदुस्थान पाकिस्तान सीमेवर एक भीषण अपघात झाला आहे. एक जुना मोर्टार फुटल्याने एका जवानाचा मृत्यू झाला असून आठ जवान जखमी झाले आहेत.

राजस्थानच्या जैसलमेर परिसरात किशनगढ फिल्ड फायरिंग रेंज येथे रविवारी हा अपघात घडला. मृत्यू झालेल्या जवानाचं नाव संदीप सिंह असं आहे. या परिसरात रविवारी सकाळी हा स्फोट झाला. इथे पाच वर्षं जुना मोर्टार पडून होता. थंडीपासून बचावासाठी काही जवानांनी शेकोटी पेटवली होती.

या शेकोटीची धग मोर्टारला बसली आणि तो फुटला. या स्फोटात सीमा सुरक्षा दलाच्या 136व्या वाहिनीचे नऊ जवान जखमी झाले. त्यात जवान संदीप कुमार सिंह हाही होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचा मृत्यू झाला. संदीप कुमार सिंह हे मूळचे धनबाद येथील आहेत. ते या परिसरात तैनात होते.

अन्य आठ जवानांवर उपचार सुरू आहेत. हा परिसर फायरिंग रेंज म्हणून ओळखला जातो. इथे काही वर्षांपूर्वीचे बॉम्ब न फुटता तसेच पडून राहिलेले आढळतात. शक्यतो असे बॉम्ब गोळे शोधून निकामी केले जातात. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून हे शोधकार्य या परिसरात झालं नव्हतं. त्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.