Video – वृद्ध महिलेचा मृतदेह बेवारस, चंद्रपुर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका महिलेचा मृतदेह तब्बल दोन दिवस बेवारस स्थितीत पडून राहिला. उपचारासाठी तिला तीन दिवसांपूर्वी इथं दाखल करण्यात आलं. पण तिला ना बेड उपलब्ध केला गेला, ना उपचार मिळाले. महिला वार्डच्या व्हरांड्यात तिला ठेवण्यात आला. पण दाखल झाल्यापासून एकही डॉक्टर तिच्याकडे फिरकला नाही. तिला कोणता आजार होता, ती कशामुळं मरण पावली, याचा कोणताही तपशील नाही. शनिवारी तिचा मृत्यू झाला. तरीही तिच्या मृतदेहाला उचलण्यात आलं नाही. लागून असलेल्या महिला रुग्ण कक्षात अनेक महिला भरती आहेत. त्यांच्यासमोर हा मृतदेह दोन दिवस पडून राहिला. आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी इथं भेट दिली, तेव्हा रुग्णालय व्यवस्थापनानं या महिलेचा मृतदेह उचलला.

ऐन कोरोना काळात शासकीय रुग्णालयाची ही उदासीनता आणि अनागोंदी रुग्णांना धडकी भरवणारी ठरली. एकीकडे उत्तम आरोग्य सेवेचे गोडवे गायले जात असताना ही घटना आरोग्यसेवेची पोलखोल करणारी ठरली. रुग्णालयातील घाणेरडे स्वच्छतागृह, कचऱ्याचे साम्राज्य रुग्णालयाचा गलथानपणा समोर आणत आहे. आता या प्रकारावर रुग्णालय व्यवस्थापन मूग गिळून आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त हे रुग्णालय आहे. डीन याचे प्रमुख आहेत, पण ते नेहमीच बघ्याची भूमिका घेत आले आणि याही प्रकरणात ते बोलायला तयार नाहीत. तथापि, या प्रकारामुळं रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला संतापलेल्या असून, हा आमच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या