जगातील सर्वात वृद्ध कोंबडी

एका कोंबडीचं साधारण आयुष्यमान जास्तीत जास्त पाच ते आठ वर्षे इतके असते, पण तुम्हाला माहीत आहे, जगातल्या सर्वात वृद्ध कोंबडीचं वय आहे चक्क 21 वर्षे! या केंबडीचे नाव पीनट आहे. तिच्या नावावर सर्वात वृद्ध जिवंत कोंबडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.

‘पीनट’ कोंबडीच्या मालकिणीचे नाव मार्सी पार्कर डार्विन असं आहे. डार्विन यांनी दिलेल्या माहितीनुसार वय वाढल्यानंतर पीनट अजूनही तितकीच तंदुरुस्त आहे. पीनट एकदम आरामदायी आयुष्य जगते. ती मालकिणीच्या मांडीवर बसून अगदी टीव्हीदेखील बघते. मालकीण तिला आपल्यासोबत अनेक ठिकाणी घेऊन जाते. घरातील श्वान आणि मांजरीसोबतही तिची खास गट्टी झालेली आहे. आयुष्यभर पीनट अगदी शहाण्यासारखं वागली आणि वागत्येय असं मार्सी यांनी सांगितले.

पीनटच्या जन्माची कहाणी रंजक आहे. अमेरिकेतल्या मिशिगनमध्ये मार्सी डार्विन यांना एका पोल्ट्री फार्ममध्ये पडलेलं एक अंड सापडलं. त्यांनी ते उचललं आणि कासवांना खायला घालता येईल म्हणून आपल्याबरोबर घरी आणलं. मार्सी पार्कर अंडं फेकणार इतक्यात अंडं फुटलं आणि त्यातून काsंबडीचं पिल्लू बाहेर आलं. मार्सी पार्कर यांनी काsंबडीचं ते पिल्लू सांभाळण्याचा निर्णय घेतला. पिल्लू लहान असल्याने त्याचे नाव पीनट असं ठेवलं.