ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनासाठी फिल्डिंग, ‘आयसीसी’ने संलग्न देशांकडून मागितले अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉल, बास्केटबॉलनंतर तिसऱया क्रमांकाचा लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटचा पुन्हा एकदा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. ‘आयसीसी’ने यासाठी संलग्न देशांकडून ऑलिम्पिक सहभागानंतर कसा आर्थिक लाभ होऊ शकतो, याबद्दलचा अहवाल मागितला आहे.

ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या पुनरागमनासाठी ‘आयसीसी’ बऱयाच वर्षांपासून प्रयत्नशील आहे. 2018 मध्ये ‘आयसीसी’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार 87 टक्के चाहत्यांनी क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाला होकार दर्शवला होता. ऑलिम्पिकमध्ये याआधी एकदा या खेळाचे दर्शन झालेले आहे. 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र बेल्जियम व हॉलंड या संघांनी माघार घेतल्याने त्यावेळी एकमेव सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यात इंग्लंड संघाने फ्रान्सचा 158 धावांनी धुव्वा उडवून सुवर्णपदक जिंकले होते. अर्थातच फ्रान्सला रौप्यपदक बहाल करण्यात आले.