शिव थापा, पूजा रानीचा गोल्डन पंच

291

ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंटमध्ये हिंदुस्थानच्या बॉक्सर्सनी सात पदकांवर मोहोर उमटवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिव थापाने 63 किलो वजनी गटात आणि पूजा रानीने 75 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यांना दमदार पंचेस मारत गोल्ड मेडल जिंकले. आशीषला 69 किलो वजनी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

चार वेळा आशियाई स्पर्धेत पदक जिंकणाऱया शिव थापाने कझाकस्तानच्या सनातली तोलतायेवचा 5-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि गोल्ड मेडलची माळ आपल्या गळ्यात घातली. पूजा रानीने ऑस्ट्रेलियाच्या केटलीन पारकरला पराभूत करीत आगेकूच केले. जपानच्या सीवोन ओकाझावा याने आशीषला हरवल्यामुळे हिंदुस्थानच्या खेळाडूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. याआधी निखात झरीन, सिमरनजीत कौर, सुमित सांगवान व वाहलिमपुईया यांनी कास्य पदक पटकावले होते.

  • मेरी कोम हिला टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीआधी निवड चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. मेरी कोमला 51 किलो वजनी गटात निखात झरीनचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये ती पास झाल्यानंतरच तिला पात्रता फेरीत खेळता येणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात निवड चाचणी होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण व रौप्य जिंकणाऱया खेळाडूंनाच पुढल्या वर्षी फेब्रुवारीत वुहान येथे होणाऱया पात्रता फेरीत थेट प्रवेश देण्यात येणार आहे. मेरी कोमला या स्पर्धेत कास्य पदक मिळाले होते.

ऑलिम्पिकसाठी मेरी कोम ऍम्बेसेडर

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून टोकियो ऑलिम्पिकसाठी 10 खेळाडूंची ऍम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये महिला विभागात हिंदुस्थानच्या मेरी कोमला स्थान देण्यात आले आहे. तसेच पुरुषांचे 5 आणि महिलांचे 5 असे एकूण 10 खेळाडू यामध्ये आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या