
चीनसह इतर काही देशांत कोरोना संसर्गाचा पुन्हा हाहाकार उडवणाऱया ओमायक्रोनने हिंदुस्थानलाही चिंतेत टाकले आहे. ओमायक्रोन व्हेरिएंट कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला जन्म देतोय. एक्स सिरीजचे व्हेरिएंट यापैकीच आहेत. यापुढे कोरोनाचे असे नवनवे अवतार येतच राहतील, असा इशारा देत केंद्र सरकारच्या सल्लागार समितीने जनतेला सावध केले आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रात एक्सई या कोरोनाच्या नव्या अवताराचे रुग्ण आढळले आहेत. एकीकडे या नव्या विषाणूचा झालेला शिरकाव व दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू होत असलेली वाढ यामुळे देशाची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एक्सई स्ट्रेन ओमायक्रोनपेक्षा दहापटीने जास्त संसर्गजन्य असल्याचा दावा केला आहे. त्यापाठोपाठ केंद्र सरकारने एक्सई स्ट्रेनबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. ब्रिटनमधून बाहेर पडलेला एक्सई स्ट्रेन हा काही शेवटचा व्हेरिएंट नाही. देशात यापुढे ’एक्सई’प्रमाणे नवनवीन व्हेरिएंट येतच राहतील, असे केंद्र सरकारच्या सल्लागार समितीने म्हटले आहे.
चिंता करू नका!
कोरोना लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी नव्या व्हेरिएंटबाबत सावध करतानाच चिंता न करण्याचेही आवाहन केले आहे. ‘एक्सई’ व्हेरिएंटबाबत चिंता करू नका. देशातील रुग्णांची आकडेवारी विचारात घेता नवा व्हेरिएंट फार वेगाने पसरत नसल्याचे दिसते. त्यापासून गंभीर आजारही होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
देशात सध्या एक्सई व्हेरिएंटचे जे रुग्ण आढळले आहेत, त्या आधारे पहिल्या टप्प्याची चाचणी केली जाईल. नव्या स्ट्रेनचा अभ्यास करण्यासाठी तीन टप्प्यांत चाचणी करणे गरजेचे आहे. आम्ही संसर्गावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
– डॉ. एन. के. अरोरा




























































