
सरत्या वर्षाला निरोप देत सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना पोलिसांनी मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी डय़ुटी फर्स्टला प्राधान्य दिले. थर्टी फर्स्टला पोलिसांनी मुंबईत ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 17 हजार 800 वाहनचालकांवर एका रात्रीत कारवाई केली. या वाहनचालकांकडून तब्बल 89 लाख 19 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडियासह मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळते. कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली होती. मंगळवारी रात्री पोलिसांनी शहरात एकूण 107 ठिकाणी विशेष नाकाबंदी लावली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी हे भेटी देऊन पोलिसांना मार्गदर्शन करत होते, तर 29 पोलीस उपायुक्त, 53 सहाय्यक आयुक्त, 2184 पोलीस अधिकारी, 12 हजार 048 पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तासाठी तैनात होते.
ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, 333 जणांना दणका
थर्टी फर्स्टच्या रात्री मद्यपी वाहनचालकांकडून अपघाताच्या घटना घडू नयेत याची खबरदारी घेतली होती. पोलिसांनी पब, हॉटेल, मालकांनादेखील सूचना दिल्या होत्या. मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱया 333 चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पहाटेपर्यंत 46 हजार 143 वाहनांची तपासणी करून 5 हजार 670 चालकांवर विविध कलमांअंतर्गत कारवाई केली आहे.
वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी 2 हजार 893 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱया 1 हजार 923 जणांवर, सिग्नल मोडणाऱया 1 हजार 731 जणांवर, वन वेमध्ये गाडी चालवणाऱया 868 जणांवर, ट्रिपल सीट वाहन चालवणाऱया 123 जणांवर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱया 109 जणांवर, चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱया 40 जणांवर, गणवेशाशिवाय वाहन चालवणाऱ्या 200 जणांवर, सीट बेल्ट न लावणाऱया 432 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.