दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा संपन्न

शारदीय नवरात्र महोत्सवात आज दुर्गाष्टमीच्या शुभमुहूर्तावर श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा अत्यंत भक्तिभावाने व धार्मिक उत्साहात संपन्न झाली. मध्यरात्री चरणार्थ विधीनंतर पहाटे सहा वाजता देवींच्या अभिषेक पूजेला प्रारंभ झाला. अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्रालंकार परिधान करण्यात आले. त्यानंतर देवीला महिषासुरमर्दिनी स्वरूपात अलंकृत करण्यात आले.

या मंगलप्रसंगी सकाळच्या वेळी झालेल्या धुपारतीत उपस्थित भाविकांना देवीच्या दैवी दर्शनाचा लाभ घेता आला. नवरात्रातील दुर्गाष्टमीचा दिवस महत्त्वाचा मानला जात असल्याने या दिवशी मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. महाराष्ट्रासह राज्याबाहेरून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

दरम्यान, काल सोमवारी श्री तुळजाभवानी देवींची मोर या वाहनावरून नयनरम्य छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भाविकांनी सहभागी होत ‘जय भवानी’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. श्री तुळजाभवानी देवीच्या या महिषासुरमर्दिनी अलंकार पूजेमुळे नवरात्र उत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे.