विमानतळावरून मोबाईल चोरी प्रकरणी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानतळावरून मोबाईलचे दोन बॉक्स चोरी केल्या प्रकरणी प्रकरणी एकाला सहार पोलिसांनी अटक केली. प्रितेशकुमार जैन असे त्याचे नाव आहे. त्याने चोरीचे मोबाईल विक्रीसाठी दुकानात ठेवले होते. या गुह्यात या पूर्वी पाच जणांना सहार पोलिसांनी अटक केली होती.

तक्रारदार हे एका एक्स्पोर्ट कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. गेल्या वर्षी त्यांनी 460 मोबाईलची ऑर्डर दिली होती. ऑर्डर दिल्यानंतर 23 मोबाईलचे बॉक्स बँगलोर येथून विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. मोबाईल बॉक्स विमानतळावर येताच विमानतळावर काम करणाऱया चार जणांनी संगनमत करून दोन बॉक्स मोबाईल चोरले. दिलेल्या ऑर्डरपैकी दोन बॉक्स मोबाईलचे कमी आल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. मोबाईलचे दोन बॉक्स चोरी प्रकरणी तक्रारदार यांनी सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

तपासा दरम्यान विमानतळावर काम करणाऱ्या चार जणांची नावे समोर आली. चोरीच्या गुह्यात त्या चौघांना अटक केली. त्या चौघांच्या चौकशीत एका आरोपीचे नाव समोर आले. त्यालादेखील पालघर येथून अटक केली. चोरीच्या गुह्यात त्या पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास सुरू असतानाच ते चोरीचे मोबाईल अंधेरी येथील एका दुकानात विक्रीसाठी ठेवल्याची माहिती सहार पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी प्रितेशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी प्रितेशला अटक केली. त्याने ते चोरीचे मोबाईल स्वस्त किमतीत विक्रीसाठी ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. चोरीच्या गुह्यात प्रितेशला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.