
सामना प्रतिनिधी, मुंबई
जेवणाच्या वादातून सहकाऱ्याची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना बुधवारी वांद्रे पूर्व परिसरात घडली. आयुब हुसेन असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी सराद खान याला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली.
आयुब आणि सराद हे दोघे उत्तर प्रदेशचे रहिवासी. ते दोघे वांद्रे पूर्वच्या बेहराम पाडय़ातील जरीच्या कारखान्यात कामाला होते. मंगळवारी ते दोघे हाजी मलंग येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे त्या दोघांचा वाद झाला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी ते मुंबईत आले. सायंकाळी आयुब आणि खानमध्ये पुन्हा वाद झाला. खानने आयुबच्या पोटात चाकू भोसकला. त्यात आयुब हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी भाभा रुग्णालयात नेले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच निर्मल नगर पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी खानला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. खानला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.



























































