
उसाच्या गरम रसाच्या टाकीच्या मेनहोलमधून अचानक वाफ बाहेर आल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल या खासगी साखर कारखान्यामध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे. यात अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संभाजी शंकर घोरपडे (वय 45, रा. शिरढोण) असे मृत कामगाराचे नाव असून अजित संजय साळुंखे (वय 24, रा. जरेवाडी) व साहिल बशीर मणेर (वय 22, रा. कुमठे) हे जखमी झाले आहेत.
जरंडेश्वर शुगर मिल या खासगी साखर कारखान्याचा 2020-2021 चा गाळप हंगाम सुरू असून शुक्रवारी रात्री 9.45 च्या सुमारास उसाच्या गरम रसाच्या टाकीच्या मेन होलमधून अचानक वाफ बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये टाकीसमोर काम करत असलेले संभाजी शंकर घोरपडे गंभीररीत्या भाजले. वाफेच्या तीव्र प्रवाहामुळे ते लांब फेकले गेले. यात त्यांच्या मेंदूला जबर मार बसला. त्यांच्यासमवेत काम करत असलेले अजित साळुंखे व साहिल मणेर हेदेखील जखमी झाले.
अन्य कामगार आणि सुपरवायझरनी घोरपडे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोरपडे यांना मृत घोषित केले. सातारा शहर पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, गुन्हा कोरेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
दोन कामगार बचावले
अजित संजय साळुंखे व साहिल बशीर मणेर यांनादेखील तातडीने कारखान्याच्या वाहनातून कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघेही 18 ते 20 टक्के भाजले असून तातडीने उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी शनिवारी घटनास्थळाची पाहणी केली.

































































