मॉडेलची फसवणूक करून अश्लील चित्रफीत युट्यूबवर केली अपलोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

सध्याच्या तरूण पिढीवर शॉर्ट फिल्म बनवत असल्याचे सांगत पुण्यातील एका मॉडेलकडून भोजपूरी ‘बी ग्रेड’च्या शॉर्ट फिल्ममध्ये काम करून घेण्यात आले. त्यातील काही दृश्यांवर तरूणीने आक्षेप घेतल्याने ती दृश्ये प्रदर्शित करणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ही शॉर्टफिल्म अश्लील दृश्यांसह यूट्यूबवर अपलोड करून व्हायरल केल्याची घटना उघड झाली आहे. फसवणूक झालेल्या मॉडेलने यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अलोकश्री गुप्ता (रा. मालाड, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात रहाणाऱ्या मॉडेलिंग करणाऱ्या तरुणीची 2016 मध्ये फेसबुकवरून अलोकश्री गुप्ता याच्यासोबत ओळख झाली. आजची तरूण पिढी कशी भरकटत आहे, स्त्री-पुरूषांचा वागणे कसे चुकीचे आहे, यावर आपण शॉर्ट फिल्म बनविणार असल्याचे त्याने मॉडेलला सांगितले. या शॉर्टफिल्ममध्ये काम करण्याबाबत त्याने तिला विचारणा केली. तरूणीने गुप्ताची भेट घेतल्यावर त्याने तिला कथानक सांगितले. तिने काम करण्यास होकार दिल्यावर वसईतील बंगल्यात शॉर्ट फिल्मच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. काही दृश्ये अश्लील असल्याने या तरूणीने पुढील चित्रीकरणास नकार दिला. त्यावेळी अलोकश्रीने हे दृष्य मी फिल्ममध्ये घेणार नाही, तू काम केले नाहीस तर माझे नुकसान होईल असे तिला सांगून तिच्याकडून चित्रीकरण पूर्ण करून घेतले. अलोकश्रीचा अनुभव चांगला नसल्याने ही तरूणी पुण्यात परतली. त्यानंतरही त्याने काही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत तिच्याकडे विचारणा केली असता, तिने नकार दिला होता.

काही महिन्यांपूर्वी या तरूणीच्या मुंबईतील मित्राने तरूणीला फोन करून तुझे दोन व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आले आहेत. त्या शॉर्टफिल्मची नावे आणि त्यातील चित्रीकरण अश्लील असल्याचे त्याने सांगितले. या तरूणीने या लिंक पाहिल्यानंतर सर्व प्रकार तिच्या लक्षात आला. त्यानंतर तिने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अलोकश्री गुप्ताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.