
सामना प्रतिनिधी। मालवण
नोकरीव्यवसायात बरकत करून देतो, आजारी व्यक्तीला बरे करतो, असे सांगून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला मालवण पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. तुकाराम बाळकृष्ण मेस्त्री (वय ५०) असे त्याचे नाव असून तो रेवतळेचा आहे.
या बाबाने आतापर्यंत मालवणातील सात जणांची फसवणूक केली आहे. त्याच्या विरूद्ध कृष्णा वासुदेव चव्हाण, वय ७२ मेढा मालवण यांनी फसवणूक केल्या प्रकरणी मालवण पोलिसांत तक्रार दिली आहे. तर अन्य तिघा व्यक्तींनाही या बाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर बाबावर फसवणूकीसह अमानुष, अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबाने जादूटोणा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकजणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. यामुळे त्याची चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी मालवण मेढा येथील कृष्णा वासुदेव चव्हाण यांच्या पत्नीच्या अंत्यविधीसाठी हा बाबा आला होता. या वेळी कृष्णा चव्हाण यांची लहान मुलगी ममता हिचा पती महेश मसुरकर हा आजारी असल्याचे कृष्णा यांनी बाबाला सांगितले. त्यावेळी बाबाने तुमचा जावई औषधाने बरा होणार नाही, त्याच्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे असे सांगितले व यासाठी पन्नास हजार रुपये खर्च येईल असे सांगितले.
त्यावेळी चव्हाण यांनी दोन टप्यात बाबाला पंचेचाळीस हजार रुपये दिले. त्यानंतर बाबाने ममताच्या कळवा ठाणे येथील घरी जाऊन जादूटोणा केला. असाच प्रकार बाबाने कृष्णा यांचा मुलगा नरेश याला व्यवसायात व नोकरीत बरकत येण्यासाठी केला. यासाठी त्याने याने नरेश कडून एकोणीस हजार रुपये व त्याच्या पत्नीकडून तीस हजार रुपये उकळले. त्यानंतर बाबा नरेश ला गाडीतून कणकवली तालुक्यातील कसवण या गावातील स्मशानभूमीत जादूटोणा करण्यासाठी घेऊन गेला. स्मशानभूमीत बाबा व अन्य दोघांनी नारळ, पिठाच्या बाहुल्या पुरल्या. हे बघून चव्हाण यांना संशय आला व त्यांनी बाबाविरोधात मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
अन्य तिघांना भोंदूबाबाने गंडविले
नोकरी व्यवसायात बरकत आणण्यासाठी भोंदूबाबाने मालवणातील आरोही चंद्रकांत साळवी यांना ४५ हजार रुपये, विशाली विजय गिरकर (सर्जेकोट) यांना ९१ हजार रुपये, तर दीपक बाळकृष्ण वराडकर (वायरी आडवण) यांना ८ हजार रुपये असा एकूण दोन लाख ४५ हजार रुपयांना गंडा घातला आहे.





























































