पेमेंट अॅप्लिकेशनच्या माध्यमातून लाच स्वीकारली, कस्टम अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेमेंट अॅप्लिकेशनच्या माध्यमातून लाच स्वीकारल्या प्रकरणी एका कस्टम अधिकाऱ्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ने गुन्हा दाखल केला आहे. एका प्रवाश्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या महिन्यात हा प्रकार घडला होता. त्यानंतर प्रवाश्याने तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन सीबीआयने शुक्रवारी गुन्हा दाखल केला. कस्टमचे अधिकारी हे लाच घेऊन परदेशातून आलेल्या प्रवाश्याची कस्टम ड्युटी माफ करत होते. सदर अधिकारी हा कस्टम विभागाचा चौथा अधिकारी असून यापूर्वी तीन अधिकाऱ्यांविरुद्ध अशा तक्रारी सीबीआकडे आल्या होत्या. त्यानंतर मुंबई विमातळावर असलेले 38 कस्टम अधिकारी सीबीआयच्या निशाण्यावर आले होते.

तक्रारदार प्रवासी 22 फेब्रुवारी रोजी लंडनहून परत आला. त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी थांबवून नवीन कपडे, बूट, बॅग यांच्याविषयी विचारणा केली. अधिकाऱ्यांनी सदर प्रवाशाला 50 हजार रुपये कस्टम ड्युटी म्हणून भरायला सांगितले आणि त्याचा पासपोर्ट काढून घेतला. त्यानंतर प्रिन्स बन्सल नावाच्या कस्टम अधिकाऱ्याने प्रवाश्याकडे 25 हजार रुपयांचच्या लाचेची मागणी केली. पुढची फ्लाईट पकडण्याच्या घाईमुळे प्रवाश्याला नाईलाजाने ती मागणी पूर्ण करावी लागली. सदर प्रवाश्याने सीबीआयकडे बन्सल आणि हवालदार संतोष वाडकर यांच्याविरुद्ध तक्रार केली. यापैकी वाडकर हा आधीच्या तीन प्रकरणांमध्येही सहआरोपी होता. त्याने ऑनलाईन पेमेंटसाठी अकाउंट्सची व्यवस्था केली आणि लोडर म्हणून काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही लाच द्यायला लावली असा आरोप सदर तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.