
सामना प्रतिनिधी । मुंबई
नालासोपारा येथील स्फोटकप्रकरणी एटीएसने शुक्रवारी रात्री घाटकोपर येथून आणखी एका तरुणाला अटक केली. याआधी पकडलेल्या चौघांच्या चौकशीत अविनाश पवार (30) याचे नाव समोर आले होते. त्यानुसार एटीएसने पवारला पकडले. त्याला आज कोर्टात हजर केले असता त्याला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळकर आणि श्रीकांत पागरकर यांना यापूर्वी एटीएसने अटक केली होती. या चौघांकडे पोलिसांना मोठय़ा प्रमाणात हत्यारे सापडली होती. शिवाय या चौघांनी काही कट रचल्याचे तपासात समोर आले. या चौघांच्या चौकशीत घाटकोपर येथे राहणाऱया अविनाश पवार याचे नाव समोर आले. त्या चौघांसोबत अविनाशदेखील कटात सहभागी असल्याचे निष्पन्न होताच एटीएसने शुक्रवारी रात्री घाटकोपर गाठून त्याला अटक केली. या कारवाईमुळे नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटक झालेल्या तरुणांची संख्या पाच झाली आहे. अविनाश हा माझगाव डॉकमध्ये कामाला होता. तसेच त्याच्या घरातून एक सीपीयू ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.


























































