सीना पात्रातील अतिक्रमण हटविताना सापडले प्राचीन दगडी जाते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

सीना नदीपात्रातील अतिक्रमण काढताना शुक्रवारी काढवन खंडोबा पुलाजवळील अमरधामच्या मागील बाजूस भल्यामोठ्या आकाराचे प्राचीन दगडी जाते आढळून आले. याबाबत तात्काळ पुरातत्त्व खात्याला माहिती दिली असून नेमका हा विषय कशा प्रकारचा आहे हे उत्खनन केल्यावरच समजू शकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सीना नदीपात्रात गेल्या आठ दिवसापासून अतिक्रण मोहीम हाती घेण्यात आली आहे. नदीपात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम सुरू आहे. नंदनवन लॉनजवळील कारवाई थांबवण्यात आल्यानंतर आजूबाजूला असणारी झाडेझुडुपे बाजुला करण्यात आली आहेत. चार पोकलंडच्या साहाय्याने सध्या ही मोहीम सुरू आहे. या अतिमक्रण मोहिमेच्या वेळी खंडाबा पुलाजवळ भल्या मोठ्या आकाराचे प्रचीन दगड जातेसदृश अवशेष आढळून आले आहे.

पालिका प्रशासनाने तात्काळ याची माहिती पुरातत्त्व खात्याला दिली. या खात्याचे एक पथक या ठिकाणी आले होते. ही वस्तु अवजड असल्याने जमिनीतून तिला वर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. ते अवशेष बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला होता. या जात्याचा खालचा भाग जमिनीत असल्याने खालच्या भागातील नक्षीकाम दिसून आले नाही. त्यामुळे हे जाते नेमके कसे आहे आणि ते तिथे कोणत्या काळापासून आहे या बाबतची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.