कोंढव्यात दोन तरूणांवर कोयत्याने हल्ला; एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खर्चाला पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे एकाने साथीदारांच्या मदतीने दोन तरूणांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील वैकुंठ स्मशानभूमी परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी शुभम रामभाऊ टिकोळे (वय 25, रा. कोंढवा खुर्द) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गणेश घुगे (वय 21 रा. कोंढवा खुर्द ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि त्यांचा मित्र संतोष परदेशी शनिवारी रात्री बिर्याणी आणण्यासाठी कोंढवा परिसरात गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या शुभमने त्यांना खर्चासाठी पैसे मागितले. मात्र, दोघांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे शुभमने संतोषला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी गणेश भांडण सोडविण्यासाठी आला असता, शुभमने त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याने संतोषच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे अधिक तपास करीत आहेत.