पाकड्यांचा नापाक डाव बीएसएफने उधळला, LoC वर चिनी पिस्तूलसह संशयित दहशतवाद्याला अटक

हिंदुस्थान-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळून लावण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी जम्मू जिल्ह्यातील परगवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. त्याच्याकडे चिनी बनावटीचे पिस्तूलही आढळून आले आहे. ‘एएनआय’ने याबाबत माहिती दिली आहे.

सदर कारवाईबाबत बीएसएफ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, परगवाल सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका संशयिताला ताब्यात घेण्यात आली. त्याची ओळखही पटली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव अब्दुल खालिक आहे. त्याच्या ताब्यातून चिनी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी परगवाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल खालिक हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून मोठ्या संख्येने दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होता. याची गुप्त माहिती मिळताच बीएसएफने त्याला अटक केली आणि परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केली. सीमा भागामध्ये त्याचे सक्रिय नेटवर्क असण्याचीही शक्यता असून त्याच अनुषंगाने पोलीस त्याची चौकशी करत आहे.