नागपूरच्या सोलर कंपनीत भीषण स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, 16 जखमी

बाजारगाव येथील सोलर एक्स्पोसिव्ह कंपनीच्या युनिटमध्ये बुधवारी मध्यरात्री भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एक कामगार ठार झाला तर सोळा जखमी झाले. कंपनीच्या पीपी 15 प्रकल्पात रात्री 12 वाजून 34 मिनिटांच्या सुमारास हा स्फोट झाला. 2018 मध्ये अशाच प्रकारचा भयंकर स्फोट झाला होता.

मयूर गणवीर (25) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. मयूर कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे आणि धर्मपाल मनोहर अशी जखमींची नावे असून त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. संरक्षण क्षेत्राला स्फोटके आणि शस्त्रे तयार करण्याचे काम या कंपनीत होते. सुमारे 30 देशांना शस्त्रास्त्रे निर्यात करण्यात येतात. कंपनीत वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे येथील कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, स्फोटाच्या आधी आग लागल्याने प्लांटमधून कामगार बाहेर पडण्यास सुरुवात झाली. त्यासाठी वेळ मिळाल्याने जीवितहानी टळली.

वारंवार होणाऱ्या घटना गंभीर – अनिल देशमुख

कंपनीत वारंवार होणाऱ्या स्फोटाच्या घटना गंभीर असून राज्य सरकारने अशा घटना घडू नये यासाठी कडक नियमावली तयार केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कंपनीला भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण घटनेची माहिती घेत जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. यात रुग्णवाहिकेचे चालक संजय गायकवाड यांनी देवदुताची भूमिका बजावली. दरम्यान, दंदे रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.