एक वर्ल्ड कप, पण अनेक विक्रम!

रथी-महारथी खेळाडूंनी सजलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने मायदेशातील क्रिकेटचा वर्ल्ड कप चांगलाच गाजविला. 46 दिवसांच्या या स्पर्धेत तब्बल 45 दिवस रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने वर्चस्व गाजवले. साखळीतील 9 सामने आणि उपात्य फेरीतील सामना अशा सलग 10 लढती जिंकणारा हिंदुस्थान हा स्पर्धेतील एकमेव अजेय संघ होता. मात्र 46व्या दिवशी फायनलमध्ये ‘टीम इंडिया’चा घात झाला. पक्के व्यावसायिक असलेल्या ऑस्ट्रेलियाने योजनाबद्ध खेळ करीत फायनलमध्ये ‘टीम इंडिया’चा विजयरथ रोखण्याचा पराक्रम करीत सहाव्यांदा वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. जगज्जेते पदाचे स्वप्न भंगले असले तरी हिंदुस्थानी फलंदाजांच्या तळपत्या तलवारी आणि गोलंदाजांच्या मुलुख मैदानी तोफांनी यंदाचा वर्ल्ड कप गाजवला, हे कोणालाही विसरता येणार नाही. यंदाच्या एका वर्ल्ड कपमध्ये अनेक विक्रम मोडीत निघाले. याबाबत दै. ‘सामना’ने घेतलेला हा आढावा…

रोहित ठरला अनेक विक्रमांचा धनी
‘टीम इंडिया’चा कर्णधार रोहित शर्माने यंदाच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये 597 फटकावल्या. एका वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला. रोहितने न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनचा विक्रम मोडला. विल्यम्सनने 2019च्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून 578 धावा केल्या होत्या. याचबरोबर रोहित शर्मा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 31 षटकार ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलचा 2015च्या वर्ल्ड कपमधील सर्वाधिक 26 षटकारांचा विक्रम मोडला. याचबरोबर रोहित शर्माने 2015 व 2019च्या वर्ल्ड कपमध्ये 23 षटकार मारलेले आहेत. म्हणजे रोहितच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 54 षटकार जमा झाले आहेत. त्याने 35 डावांत 49 षटकार ठोकणाऱया ख्रिस गेलचा हा विक्रमही मोडीत काढला. याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक 582 षटकारही रोहित शर्माच्या नावावर जमा आहेत.

द. आफ्रिकेची सर्वोच्च धावसंख्या
दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्ध शतके ठोकून 428 धावांचा डोंगर उभारला होता. वन डे वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. दक्षिण आफ्रिकेने 2015च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 417 धावा करणाऱया ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा
‘टीम इंडिया’ची ‘रन मशीन’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या लौकिकास जागला अन् स्पर्धेच्या इतिहासात एका सत्रात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 11 सामन्यांत 765 धावांची लयलूट करून त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. सचिनने 2003च्या वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होता. तब्बल 20 वर्षे अबाधित राहिलेला सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम या वेळी विराटने मोडीत काढला.

सर्वाधिक वन डे शतके
विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात कारकिर्दीतील 50वे वन डे शतक झळकावत सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. सचिनच्या नावावर 49 वन डे शतकांचा विक्रम होता. शिवाय विराटने सचिनपेक्षा 173 डाव कमी खेळून हे शतकांचे अर्धशतक गाठले हे विशेष!

बळींचे वेगवान अर्धशतक
हिंदुस्थानच्या मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्ध तिसरा बळी टिपताच वर्ल्ड कपमधील वेगवान बळींचे अर्धशतक पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद केवळ 17 डावांत हे बळींचे अर्धशतक साजरे केले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचा 19 डावांत 50 बळी टिपण्याचा विक्रम मोडीत काढला. शमीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 24 बळी टिपण्याचा पराक्रम केला.

बास डी लिडे ठरला महागडा गोलंदाज
नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाज बास डी लिडेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 षटकांत 2 गडी बाद करण्यासाठी तब्बल 115 धावा मोजल्या. त्यामुळे वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत महागडा गोलंदाज ठरण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला. लिडेने या वर्षी सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 113 धावा देणाऱया ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झम्पाचा विक्रम मोडला.

मॅक्सवेल ठरला वेगवान शतकवीर
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूंत शतक झळकावले. त्याचे हे शतक क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वांत वेगवान शतक ठरले. त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने याच वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध 49 चेंडूंत शतक झळकावून हा विक्रम आपल्या नावावर केला होता.

वन डे धावांचा पाठलाग करताना पहिले द्विशतक
अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने (नाबाद 201) संस्मरणीय द्विशतक झळकावले होते. वन डेमध्ये धावांचा पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल हा पहिलाच फलंदाज ठरला, हे विशेष.