
उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पात लागलेल्या भीषण आगीचा महानिर्मितीला मोठा फटका बसला आहे. महानिर्मितीच्या गॅसवरील वीजनिर्मिती प्रकल्पाला ओएनजीकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र आगीमुळे येथील गॅस पुरवठा ठप्प झाल्याने येथील वीजनिर्मिती पूर्णपर्ण बंद झाली आहे.
उरण येथे महानिर्मितीचा तब्बल 672 मेगावॅट क्षमतेचा गॅसवरील वीज प्रकल्प आहे. हा वीज प्रकल्प वीज पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी दररोज 3.35 दशलक्ष घनमीटर एवढ्या गॅसची आवश्यकता आहे, पण गेल्या चार-पाच वर्षापासून गॅसचा तुटवडा असल्याने सध्या केवळ दोन-सवादोन दशलक्ष घनमीटर गॅसचा पुरवठा होत आहे. त्यामुळे प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता 672 मेगावॅट असतानाही अपुऱया गॅसमुळे दररोज सुमारे 250 मेगावॅट एवढी कमी प्रमाणात वीजनिर्मिती होत आहे. त्यातच आज ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्पात आगीचा भडका उडाल्याने महानिर्मितीला होणारा वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे वीजिनिर्मिती बंद झाली आहे. दरम्यान, सध्या बंद असलेला गॅसपुरवठा कधी पूर्ववत होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्वस्ताची वीज
उरण गॅस प्रकल्पातून तयार होणारी वीज औष्णिक वीज प्रकल्पांच्या तुलनेत स्वस्त आहे. येथील प्रतियुनिट विजेचा दर सुमारे 3 रुपये एवढा कमी आहे. मात्र येथील वीज निर्मितीच बंद झाल्याने औष्णिक किंवा जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती वाढवावी लागली आहे.




























































