शेतकऱ्यांची स्वप्ने मातीमोल झाली, संकटांचे डोंगर उभे ठाकले; शेतपिकांचे कोट्यवधींचे नुकसान

जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. निफाड, येवला, सिन्नर तालुक्यात कांदा पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. कर्जफेड, मुलांच्या शिक्षणाचा खर्च या चिंतेने शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत. अनंत अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर संकटांचा डोंगर निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. शेतपिकांच्या नुकसानीबरोबरच घरांची पडझड झाल्याने निवाराही गेला आहे. जनावरे मृत पावली आहेत. काही ठिकाणी हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीतील शेतकरी यामुळे हतबल आहेत. दोन-चार दिवसांपासून निफाड, येवल्याला पावसाने झोडपल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येवल्यात रविवारी संध्याकाळच्या पावसाने अक्षरशः पळापळ झाली, रस्त्यांचे तळे झाले, काही भागात घरांमध्ये पाणी शिरले. सिन्नर तालुक्यात एका दिवसात 150.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लाखो क्विंटल कांदा सडला

येवला, सिन्नर, निफाड, सटाणा या भागात शेतपिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतातील मक्याचे उभे पीक आडवे झाल्याने मोठा फटका बसला आहे. पालेभाज्या, फळभाज्यांसोबतच सर्वाधिक नुकसान कांद्याचे आहे. शेतांचे तळे झाल्याने काढणीला आलेला कांदा शेतातच सडला आहे. शेतात आणि खळ्यावर पोळ मारून झाकलेल्या, तसेच चाळीत साठविलेल्या कांद्यात पाणी गेल्याने तोही सडला आहे. जिह्यात लाखो क्विंटल कांद्याचा चिखल झाला असून, आर्थिक संकटांचा डोंगर निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत.

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

सटाणा व पेठ तालुक्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. सटाणा तालुक्यात गोपाळसागर धरणालगत जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या धक्क्याने केळझर येथील लखन केशव चौरे (14) याचा मृत्यू झाला. पेठ तालुक्यातील इनामबारी येथे घर बांधकामाच्या ठिकाणी शॉक लागल्याने विष्णू जयराम पाडवी (48) दगावले.