ऐन सणासुदीत गृहिणींच्या किचन बजेटचा होणार वांदा, कांदा 100 रुपये होणार!

सुरीने कापताना डोळ्यातून पाणी काढणारा कांदा मुंबईकरांना आता ढसाढसा रडविणार आहे. राज्यात एकीकडे आलेला महापूर आणि दुसरीकडे पडलेला दुष्काळ यांचा विपरीत परिणाम कांद्यावर झाला आहे. महापुराचे पाणी वखारींमध्ये शिरल्यामुळे साठविलेला जुना कांदा खराब झाला तर पावसाने सुरुवातीला दडी मारल्यामुळे गुलाबी कांद्याची लागवड दोन महिने लांबणीवर पडली. त्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाली असून किलोचे दर थेट 45 रुपयांपर्यंत गेले आहेत. किरकोळ बाजारात हा कांदा 65 ते 70 रुपये किलोने विकला जात असून लवकरच तो 100 रुपयांपर्यंत जाणार आहे.

राज्याच्या अनेक भागात गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन कमी निघाले. शेतकरी हा कांदा मोठय़ा प्रमाणात वखारीमध्ये साठवितात आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बाजारात आणतात. मात्र यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला आणि महापुराचा जोरदार फटका या साठवलेल्या कांदाला बसला. याच भागात नव्याने लावण्यात आलेल्या गुलाबी कांद्याचे पीकही या पावसामुळे वाया गेले. त्याचाही परिणाम सध्या मार्केटवर झाला असून एपीएमसीमधील गाडय़ांची आवक 100च्या आत आली आहे. त्यामुळे कांद्याचे दर थेट 40 ते 45 रुपये किलोपर्यंत गेले आहे. बदला कांदा30 ते 35 रुपये किलोने विकू लागला आहे. ठोक मार्केटमध्ये हाफ सेंच्युरीच्या जवळ आलेल्या कांद्याने मात्र किरकोळ बाजारात 65 ते 70 रुपयांचा टप्पा पार केला असून त्याची वाटचाल शतकवारीच्या दिशेने सुरू झाली आहे.

नवीन कांद्याची लागवड जूनऐवजी सप्टेंबरमध्ये

गुलाबी कांद्याची लागवड जून किंवा जुलै महिन्यात केली जाते. लागवडीनंतर हा कांदा तीन महिन्यांत मार्केटमध्ये येतो. मात्र महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाने दडी मारली. त्यामुळे कांद्याची लागवड थेट सप्टेंबरमध्ये झाली. हा कांदा आता डिसेंबरच्या आसपास बाजारात येणार आहे. अनेक ठिकाणी एका एका पावसावर शेतकर्‍यांनी कांद्याची लागवड केली आहे. जर यापुढे पावसाने सुरुवातीप्रमाणे दडी मारली तर या कांद्याचे भवितव्य अधांतरी ठरणार आहे.

परराज्यातील कांदा बंद

एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरातमधून कांद्याची आवक होते, मात्र महापुराचा फटका या दोन्ही राज्यांना नसल्यामुळे तेथील कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बंगलोर मार्केटमध्ये कांद्याचा दर थेट 48 रुपये किलो झाला असल्याने तेथील शेतकर्‍यांनी एपीएमसीऐवजी स्थानिक मार्केटला प्राधान्य दिले आहे.

दिल्लीत अर्धशतक पार

महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत कांद्याचे उत्पादन यंदा कमी झाल्यामुळे दिल्ली, पंजाब ओडिशामधील मार्केट तेजीत आले आहेत. दिल्लीच्या ठोक बाजारात कांदा 55 तर पंजाब आणि ओडिशामध्ये 50 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्याचा परिणामही एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या आवकवर झाला आहे.

शेतीच्या बांधावर महाग खरेदी

देशभरातील सर्वच मार्केट तेजीत आल्यामुळे कांद्याची खरेदी शेतीच्या बांधावर महाग होत आहे. त्यामुळे तो पुणे आणि मुंबई मार्केटमध्ये चढय़ा दराने विकला जात आहे. या वाढीव दराचा सामना ग्राहकांना आणखी दोन महिने करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया आळेफाटा मार्केटमधील व्यापारी संतोष गांधी यांनी व्यक्त केली आहे.

डिसेंबरच्या आसपास दर कमी होणार

  • पूर्वी गुलाबी कांद्याची पहिली गाडी नवरात्रीपूर्वीच मार्केटमध्ये यायची. मात्र आता पाऊस वेळेवर पडत नसल्याने हे समीकरण बदलले आहे.
  • यंदा नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यातील जुन्या कांद्याला पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली.
  • गुलाबी कांद्याची लागवड उशिराने
    झाल्यामुळे हा कांदा थेट नोव्हेंबरच्या शेवटी मार्केटमध्ये येणार असून डिसेंबरपासून वाढलेले दर कमी होऊ शकतात, अशी शक्यता एपीएमसीमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या