दोन महिने गृहिणींच्या डोळय़ांत येणार पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या गावरान कांद्याच्या खाली होत चाललेल्या ऐरणी आणि परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने नवीन गुलाबी कांद्याचे उद्ध्वस्त झालेले फड, त्याचा विपरित परिणाम यंदा कांद्याच्या उत्पादनावर झाला आहे. एपीएमसी मार्केटमधील आवक निम्म्याने घटल्यामुळे जुना कांदा 120 आणि नवीन कांदा 100 रुपये किलो दराने मंगळवारी विकला गेला. गेल्या दहा दिवसांपासून कांद्याचे दर विजेच्या वेगाने वाढत असल्याने ठोक बाजारात कांदा लवकरच सवाशे पार जाणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. परदेशातून आयात होणाऱया कांद्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे त्याचा कोणताही फरक बाजारभावावर अद्याप जाणवला नाही.

मुंबई शहर आणि परिसराला दररोज सुमारे सवाशे ट्रक कांदा लागतो. मात्र ही आवक सध्या निम्म्यावर आली आहे. मंगळवारी एपीएमसीच्या कांदा  मार्केटमध्ये 90 गाडय़ांची आवक झाली. मात्र कांदा आणणाऱया वाहनांमध्ये निम्मी संख्या ही टेम्पोंची होती. ट्रकच्या तुलनेत टेम्पोत फार कमी माल बसतो. आवक कमी झाल्यामुळे जुना कांदा 100 ते 120 आणि नवीन कांदा 80 ते 100 रुपये किलो या दराने विकला गेला. इजिप्तमधून आयात केलेला कांदाही सध्या एपीएमसी मार्केटमध्ये विकला जात आहे. मात्र या कांद्याची आवक दररोज एक ते दोन कंटेनर इतकीच आहे. हा कांदा 70 रुपये किलो या दराने विकला जात आहे, असे कांदा व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.

दर क्विंटलचा की किलोचा?

ठोक बाजारात कांद्या 100 रुपये किलोच्या पुढे गेल्यामुळे किरकोळ बाजारात दरवाढीचा आगडोंब उसळला आहे. 130 ते 150 रुपये किलो दराने कांदा किरकोळ बाजारातून ग्राहकांना खरेदी करावा लागत आहेत.  विक्रेत्यांनी कांदाचा दर सांगितल्यानंतर हा दर क्विंटलचा की किलोचा हा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. एक रुपयात दोन किलो मिळणाऱया चिंगळी कांद्याने ठोक बाजारात सुमारे 50 रुपये किलोचा भाव खाल्ला आहे.

जानेवारीच्या शेवटी दिलासा

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि खान्देशात गावरान कांद्याची लागवड ही दिवाळीच्या आसपास केली जाते. परतीच्या पावसामुळे अनेक भागात लागवड उशिराने झाली आहे. काही भागात लागवड आता सुरू झाली आहे. चाकण, शिरुर, पारनेर, नगर, जुन्नर या भागात गावरान कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणात झाली असून हा कांदा जानेवारीच्या अखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे, तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया कांदा व्यापारी राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केली आहे.

70 वर्षांनंतर कोपरगावात कांद्याला विक्रमी भाव

कोपरगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला विक्रमी भाव मिळाला. 70 वर्षांतील कांदा दराचे उच्चांक मोडीत काढत कांद्याला प्रतिक्विंटल 13,700 रुपये म्हणजेच प्रतिक्रिलो 137 रुपयांचा भाव मिळाल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे व उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली.

पुण्यात कांदा 150 रुपये किलो

यंदा झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांद्याला बसला आहे. कांद्याचा जुना साठा जवळपास संपला असल्यामुळे कांद्याचे दर कडाडले आहेत. मार्केटयार्डात  जुना कांद्याला प्रतिक्विंटलला तब्बल 13 हजार रुपये, तर नवीन कांद्यास तब्बल 10 हजार रुपये भाव मिळाला. पुणे बाजार समितीमधील हा भाव आजवरचा सर्वाधिक आहे. 2013 मध्ये प्रतिक्विंटल कांद्याला 6000 रुपये भाव मिळाला होता. तर, दुसरीकडे किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा दर 150 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.