पशुधन अनुदानित योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

जिल्हा पशुधन उपायुक्त विभागाच्या अनुदानित योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुक्कुट पक्षी, दुधाळ जनावरे, शेळी-मेंढी गट या लाभासाठी हे अर्ज सादर केल्यानंतर प्रथम लाभार्थी निवड केली जाणार आहे. त्यानंतर प्रस्ताव मागविले जाणार असल्याची माहिती जिल्हा उपायुक्त पशुधन विभागाच्यावतीने देण्यात आली.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेतून ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज मागविण्यात आले आहेत. https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर हे अर्ज भरावयाचे आहेत. एक हजार मांसल कुक्कुट पक्षी, दुधाळ संकरित गायी किंवा म्हैसी दोन, चार किंवा सहा पुरविणे, शेळी-मेंढी योजनेअंतर्गत १० शेळ्या व १ बोकड पुरविणे अशा या तीन योजना आहेत.

सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के तर अनुसूचित जाती, आदिवासी या समाजासाठी ७५ टक्के अनुदान असणार आहे. यामध्ये महिला ३० टक्के तर दिव्यांग ३ टक्के असे राखीव आहे. ऑनलाईन सादर झालेल्या अर्जाची छाननी ऑनलाईनच पूर्ण करण्यात येणार असून पात्र लाभार्थी यादी जिल्हा पशुधन उपायुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती ठरवून दिलेल्या उद्दीष्ठाला अधीन राहून आरक्षण नुसार लाभार्थी निवडणार आहेत. शिल्लक राहिलेले लाभार्थी प्रतीक्षा यादीत ठेवण्यात येणार आहेत. हि निवड झाल्यानंतर संबंधित लाभार्थीकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक लाभार्थीनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुधन उपायुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.