
सामना ऑनलाईन । मुंबई
बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलतोय असे भासवून सायबर भामटय़ाने ऑनलाइन फसवणूक केली. फसवणूकप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. बँकेतून बोलतोय असे सांगून तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे असे भासवून ग्राहकाची माहिती काढून घेतात. कांदिवली येथे राहणाऱ्या एकाची अशीच 2 लाख 65 हजारांची ऑनलाइन फसवणूक झाली. गुरुवारी तक्रारदार हे घरी होते तेव्हा त्यांना मोबाईलवर एक फोन आला. आपण बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलतोय असे भासवले. भामटय़ाने तक्रारदारांच्या बँक ऍक्टिव्हेशन क्रमांकाची माहिती घेतली. त्यानंतर बँक खात्यातून आणि क्रेडिट कार्डवर डल्ला मारला. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
























































