
ऑनलाइन संकेतस्थळावरून वेब कॅमेरा आणि इअर फोन खरेदीच्या नावाखाली फसवणूक केल्याची घटना घडली. फसवणूकप्रकरणी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तक्रारदार हे सांताक्रुज परिसरात राहतात. त्याच्या मुलाला वेब कॅमेरा आणि इअर फोन हवा होता. त्याने गेल्या आठवडय़ात गुगलवर काही संकेतस्थळाची माहिती काढली. त्याला एका संकेतस्थळावर मोबाईल नंबर दिसला. त्या नंबरवर त्याने फोन केला. समोरील व्यक्तीने आपल्याकडे वेब कॅमेरा आणि इअर फोन असल्याचे सांगितले. विश्वास बसावा म्हणून फोटो देखील पाठवले.
वस्तू खरेदीसाठी ऑनलाइन पैसे द्यावे लागतील असे सांगून एक लिंक पाठवली. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) घेऊन तक्रारदाराच्या बँक खात्यातून 67 हजार 495 रुपये काढले. खात्यातून पैसे गेल्याचे समजताच त्यांनी बँकेत जाऊन खाते बंद केले. फसवणूकप्रकरणी त्यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.





















































