कितीही अर्ज आले तरी 200 जणांनाच फेलोशिप, पीएचडी संशोधकांचे भवितव्य अंधारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भोगले

महाराष्ट्रात जास्तीत जास्त विषयांवर संशोधन व्हावे, अधिकाधिक संशोधक निर्माण व्हावेत यासाठी महाविकास आघाडी सरकारने नेहमीच प्रोत्साहन दिले. पीएचडी करणाऱया बहुतांश विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली. मिंधे सरकारमुळे मात्र हजारो पीएचडी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. हजारो गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी फेलोशिपची गरज आहे. परंतु मिंधे सरकारने मात्र दरवर्षी फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप द्यायचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीस मिळवली आहेत. यासंदर्भात शासन दरबारी विचारणा करणाऱया विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.

‘सारथी’, ‘बार्टी’ या संस्थांप्रमाणे ‘महाज्योती’ या संस्थेच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त जमातींमधील विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. दर महिन्याला 31 हजार रुपये दिले जातात तसेच वसतिगृहे नसलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ठरावीक रक्कम दिली जाते. आकस्मिक खर्चासाठीही निधी दिला जातो. ही रक्कम वर्षातून दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. फक्त पाच वर्षांसाठी ही फेलोशिप दिली जाते. पाच वर्षांनंतर किंवा तत्पूर्वी पीएचडी पूर्ण झाली तर ही फेलोशिप बंद होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2021 मध्ये अर्ज केलेल्या 957 विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली होती. 2022 मध्ये सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील 1226 पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली होती. मिंधे सरकार सत्तेवर येताच फेलोशिप देण्यात येणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली. फक्त 50 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय सरकारने घेतला. विद्यार्थ्यांकडून तसेच समाजातून त्या निर्णयाला विरोध झाल्याने संख्या वाढवून 200 करण्यात आली. या वर्षी 1400 विद्यार्थ्यांनी पीएचडी फेलोशिपसाठी अर्ज केला आहे, मात्र या संख्यामर्यादेमुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

सरसकट सर्वांना फेलोशिप द्या, आझाद मैदानात विद्यार्थ्यांचे उपोषण
सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या अशा मागणीसाठी पीएचडी संशोधक विद्यार्थी मुले-मुली आणि त्यांच्या पालकांनी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात उपोषण आंदोलन सुरू केले आहे. परंतु दहा दिवस झाले तरी अद्याप सरकारचा कुणीही प्रतिनिधी त्या विद्यार्थ्यांच्या भेटीला आलेला नाही. एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयातही दाखल करावे लागले. तरीसुद्धा सरकारला दया आलेली नाही, असा आरोप समितीने केला आहे.

वित्त सचिव म्हणतात… जबाबदारी बहुजन कल्याण विभागाची

‘महाज्योती’चे व्यवस्थापक म्हणतात वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती फेलोशिपबाबत निर्णय घेऊ शकते. वित्त सचिवांनी मात्र हा विषयच आपल्या अखत्यारित नसून बहुजन कल्याण विभागाकडे येतो असे विद्यार्थी कृती समितीला सांगितल्याची माहिती मिळाली.

विद्यार्थी संख्येची जबाबदारी आमची नाही

किती विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी हा निर्णय आमचा नाही, तर सरकारचा आहे. वित्त विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्यासंदर्भात उच्चाधिकार समिती नेमण्यात आली असून त्या समितीला ते अधिकार देण्यात आले आहेत.
n राजेश खवले, व्यवस्थापक, महाज्योती