
सोलापूर जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रभाव आणि तोडकी पडणारी वैद्यकीय सुविधा लक्षात घेत सोलापूर जिल्हा पोलीस वेल्फेअरने अवघ्या 38 तासात पंढरपूरमध्ये सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल उभारले आहे. याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत तर इतर रुग्णांना अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा दिली जाणार असल्याची माहिती पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांच्या तुलनेने शासकीय आणि खाजगी हॉस्पिटल कमी पडत आहेत. कोरोना प्रसाराची ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेत सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी तात्पुरते कोविड हॉस्पिटल उभारण्याची संकल्पना मांडली. हॉस्पिटल उभे करायचे तर त्यासाठी आर्थिक निधी कुठून उभा करायचा हा यक्ष प्रश्न होता. पण हा प्रश्न पोलीस वेल्फेअरच्या वार्षिक निधीतून करण्याचा प्रस्ताव पुढे आला आणि हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा झाला.
पंढरपूरच्या पोलीस संकुलात हे हॉस्पिटल उभा करण्याचे ठरले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला तातडीने मान्यता देत कामाला चालना दिली. साताऱ्याच्या रोहन वाघमारे यांच्या ब्ल्यू आर ग्रुप ऑफ बिजनेसने हे पेलत फक्त 38 तासात सर्व सुविधांनी सुसज्ज असे 40 बेडचे हॉस्पिटल उभे केले. हॉस्पिटल युद्धपातळीवर उभारले पण त्यासाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्याचा शोध सुरु झाला अन पंढरपूरच्या डॉ. संजय देशमुख यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करुन पोलिसांचे हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल झाले. कोरोना महामारीच्या काळात सेवा बजावणाऱ्या अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. आता पोलिसांचे हक्कांचे हॉस्पिटल सुरु झाल्याने लॉकडाऊन काळात सेवा वाजवणाऱ्या पोलिसांना या सेवेमुळे दिलासा मिळणार आहे. पोलिसांनी स्वनिधीतून उभारलेले हे राज्यातील एकमेव कोविड हॉस्पिटल इतरांसाठी प्रेरणादायी आहे.





























































