
मुंबईत पावसाचे आगमन जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी मंगळवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अंधेरी सब वेसह काही सखल भागांत पाणी साचले. त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. आधीच दीड महिना उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईची डेडलाईन 31 मे रोजी संपत असून आतापर्यंत पालिपेने केवळ 64 टक्के नालेसफाई पूर्ण केली आहे.
मुंबईत पावसाळय़ापूर्वी 80 टक्के, पावसाळय़ात 10 टक्के आणि पावसाळा संपल्यावर 10 टक्के अशा तीन टप्प्यांत छोटे आणि मोठय़ा नाल्यातील गाळ काढण्यात येतो. मुंबई महापालिकेने 23 पंत्राटदारांकडे नालेसफाई आणि मिठी नदी व इतर नदीपात्रातील गाळ काढण्याची कंत्राटी कामे देण्यात आलेली आहेत. त्यासाठी पालिका तब्बल 395 कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी पालिकेने कडक अटी-शर्ती आणि नियम लागू केले आहेत. कंत्राटदारांना नालेसफाई काम सुरू करण्यापूर्वी आणि नालेसफाई कामानंतर पह्टो आणि व्हिडीओ शूटिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संबंधित अभियंत्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
21 मेपर्यंतचा नालेसफाईचा डॅशबोर्ड
मुंबई शहर 70.16 टक्के
पूर्व उपनगर 85.45 टक्के
पश्चिम उपनगर 85.41 टक्के
मिठी नदी 49.56 टक्के
छोटे नाले 53.82 टक्के
एकूण नालेसफाई 64.22 टक्के
उघडय़ा मॅनहोल्सचा धोका कायम
मुंबईत एक लाख मॅनहोल्स असून पावसाळय़ात उघडय़ा मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेकडून 2023 पासून त्यावर संरक्षक जाळय़ा बसवण्यात येत आहेत. महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी मुंबईतील मॅनहोल्सवर लोखंडी झाकण बसवून ती सुरक्षित आहेत की नाहीत याची खात्री करण्याचे निर्देश पर्जन्य जलवाहिनी विभागाला दिले आहेत, मात्र मॅनहोल्सवर संरक्षक जाळय़ा बसवण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.
मेट्रोलगत मिठीच्या काठावर दुर्गंधी
गेले दोन दिवस मुंबईत पडत असलेल्या सरी आणि संततधार पावसामुळे मिठी नदीच्या काठावर काढून ठेवण्यात आलेल्या गाळाला भयंकर अशी दुर्गंधी सुटली आहे. धारावीतील मिठी नदीच्या काठावर पंत्राटदाराने मुख्य रस्त्यालगत आणि मेट्रो स्थानकाजवळच उघडय़ावर गाळ टाकून ठेवला आहे. त्यामुळे धारावीकरांसह या मुख्य रस्त्यावर ये-जा करणाऱयांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गाळ सुकल्यावर तो तिथून हलवण्यात येईल, असे पंत्राटदाराने सांगितले, मात्र सुरू असलेल्या पावसात गाळ सुकत नसल्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वे रुळावरही पाणी साचणार
पावसाळा तोंडावर आला तरी मुंबईत रेल्वे मार्गावरील गटारे गाळ आणि कचऱयामुळे तुंबलेलीच आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांच्या आवारात गटारे, नालेसफाईचे काम अर्धवट आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या ओव्हरहेड वायरवर पडण्याच्या स्थितीत आहेत. मंगळवारच्या पावसात रेल्वेच्या अर्धवट कामांची पोलखोल झाली. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाआधी ती कामे पूर्ण होणार का, असा संतप्त प्रश्न मुंबईकर उपस्थित करीत आहेत.