हिंदुस्थान-न्यूझीलंडदरम्यान पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये लढत, 4000 प्रेक्षकांनाच परवानगी,

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांनी चार हजार प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. हॅम्पशायर काउंटी क्लबचे प्रमुख रॉड ब्रॅन्सग्रोव्ह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

‘ईसीबी’ने सप्टेंबर 2019नंतर प्रथमच मैदानात प्रेक्षकांना येण्यासाठी परवानगी दिली आहे. रॉड ब्रॅन्सग्रोव्ह एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी तिकिटांना मोठी मागणी आहे. उपलब्ध तिकिटांपैकी 50 टक्के तिकिटे ही आयसीसी आणि त्यांच्या प्रायोजक तसेच इतर लोकांना मिळतील. उर्वरित 2 हजार तिकिटांची सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना विक्री केली जाणार आहे. आम्हाला चाहत्यांकडून दुपटीहून अधिक तिकिटांची मागणी आली आहे असेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे इंग्लंडने हिंदुस्थानसह काही देशांतील विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे आयसीसी आणि बीसीसीआय यांचे किती सदस्य सामना पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये येतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र, हे सदस्य सामना पाहण्यासाठी आले नाहीत तर त्यांची तिकिटे क्रिकेटप्रेमींसाठी नक्कीच उपलब्ध करून दिली जातील, असेही रॉड यांनी सांगितले.

 ‘टीम इंडिया’च्या स्वागतासाठी उत्सुक

‘टीम इंडिया’चे साऊथम्पटन येथे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक असल्याचे रॉड ब्रॅन्सग्रोव्ह यांनी आवर्जून सांगितले. याच मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल होणार आहे. या सामन्यानंतर इंग्लिश काऊंटी स्पर्धेसाठीही प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश देण्याचा आमचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदुस्थानच्या इंग्लंड दौऱयासाठी आम्ही सर्वतोपरी तयारी केली आहे. ‘टीम इंडिया’चा हिंदुस्थानातील क्वारंटाइन कालावधी संपण्याची आम्ही वाट पाहत आहोत,  असेही रॉड ब्रॅन्सग्रोव्ह यांनी सांगितले.