अॅसिडची नदी असणारा, निळा लाव्हारस ओकणारा जगातील एकमेव ज्वालामुखी, वाचा सविस्तर

सक्रिय, निष्क्रिय, विलुप्त, केंद्रीय आणि भेगीय असे ज्वालामुखीचे अनेक प्रकार सांगितले जातात, मात्र जगात असाही एक ज्वालामुखी आहे, ज्यातून निळ्या रंगाचा लाव्हारस उधळतो. ही एक आश्चर्यकारक नैसर्गिक घटना आहे.

इंडोनेशियामधील बानयूवांगी रीजेंसी आणि बोंडोवोसो रीजेंसीच्या सीमेवर हा निळ्या रंगाचा ज्वालामुखी निघतो. या ज्वालामुखीची निळा लाव्हा, निळ्या आगीच्या ज्वाला, अॅसिडची नदी आणि सल्फरची (गंधक) खाण ही वैशिष्ट्ये असल्यामुळे याचे नाव ‘कावा इजेन ज्लालामुखी’ असे आहे. या ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक 1999 साली झाला होता.

वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार, या ज्वालामुखीचा काल्डेरा 20 किलोमीटर रुंद आहे. येथे अनेक पर्वत आहेत. येथे गुरुंग मेरापी नावाचे आग ओकणारे पर्वत आहेत. यामधून निळी आग आणि निळा लावा बाहेर पडतो. येथे एक विवर असून त्याचा व्यास साधारण 1 किलोमीटर आहे. येथून निळ्या रंगाची नदी वाहते या नदीचे पाणी अॅसिडिक असते. या ठिकाणी वास्तव्य करणारे नागरिक येथील खाणीतून सल्फर खणून घेऊन जातात. येथील खाण्यांमधून गंधक खणून काढणाऱ्या कामगारांना एका दिवसाचे 13 डॉलर म्हणजे 1013 रुपये मिळतात. या कामगारांना गंधकाचा तुकडा घेऊन तीन किलोमीटर खोल दरीत उतरावे लागते.

पर्यटकांना विशिष्ट प्रकारचे रासायनिक मास्क 

कावा इजेन ज्वालामुखीचे विवर जिथून सुरू होते तिथून निळ्या रंगाची आग आणि निळा लाव्हा बाहेर पडतो. त्याचा व्यास 722 मीटर आहे. या विवरात सल्फ्युरिक अॅसिडचे प्रमाण खूप जास्त आहे. याचे तापमान 600 अंश सेल्सियसपर्यंत जाते. तसेच ही आग 16 फूट उंच असते. ही जगातील सर्वात मोठी अॅसिडची नदी आहे. गंधकयुक्त वायू बाहेर पडल्यामुळे या नदीतून येणारी आग निळ्या रंगाची दिसते. या ज्वालामुखीला भेट देणाऱ्या पर्यटकांना विशिष्ट प्रकारचे रासायनिक मास्क घालावे लागतात. अन्यथा, सल्फरच्या वासाने पर्यटकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांचे आरोग्य बिघडते.