
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन टंचाईमुळे लोकांचे नाहक बळी गेले. यास केंद्र सरकारचा हलगर्जीपणा कारणीभूत असताना ऑक्सिजनटंचाईवरून विरोधकांनीच कोरोना काळात राजकारण केल्याचा उफराटा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत केल्याने सभागृह क्षणभरासाठी स्तब्ध झाले.
प्रश्नोत्तराच्या तासांत ऑक्सिजन टंचाईवर काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन टंचाई वाढल्यानंतर केंद्र सरकारने परदेशातून ऑक्सिजन टँकर्स मागवले. नौदल व हवाई दलाचीही मदत घेतली. दुसऱ्या लाटेवेळी 1400 मेट्रिक टन इतकी ऑक्सिजनची गरज होती. ती सरकारने हरतऱहेने प्रयत्न करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्व प्र्रयत्न करूनही याप्रकरणी राजकारण केले गेले. काही जणांनी अतिरिक्त ऑक्सिजनची मागणी करत न्यायलायाचे दरवाजे ठोठावले तर दिल्लीत काही जणांनी नियोजित ठिकाणी जाणारे ऑक्सिजनचे टँकर्स दुसरीकडे वळवल्याचे आम्ही पाहिले आहे, अशा शब्दांत मांडविया यांनी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारवर टीका केली.
खासदार निलंबनप्रकरणी सरकार-विरोधकांनी मार्ग काढावा
पावसाळी अधिवेशनातील गोंधळ प्रकरणी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या 12 खासदारंच्या बाबतीत सरकार व विरोधी पक्षाने सामंजस्याने मार्ग काढावा, अशी सूचना राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी आज केली.
























































