पडद्यावरची ‘भुतं’ दाखवायला लागते काही तासांची मेहनत! कशी?? वाचा सविस्तर…

1944

सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे घरबसल्या लोक टीव्हीवरील कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहेत. या अनुषंगाने काही जुन्या मालिकाही टीव्हीवर दाखवण्यात येत आहेत. त्यात काही भीतीदायक म्हणजे भुतांच्या मालिकांचाही समावेश आहे. पडद्यावर काही मिनिटं अवतरून प्रेक्षकांच्या तोंडचं पाणी पळवणारं भूत पडद्यामागे मात्र प्रचंड वेळखाऊपणा करतं. गंमत वाटली का ऐकायला? पण हो. हे खरं आहे.

laal-ishq-on-tv-1

टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर दिसणारी भुतं साकारणं हे एक अत्यंत आव्हानात्मक काम आहे. काम कसलं, ती एक कला आहे. कारण कमीत कमी वेळात प्रेक्षकाला घाबरवून सोडण्यासाठी प्रचंड काम करावं लागतं आणि पडद्यामागे राहून मेकअप करणारे कलाकार हे प्रचंड कष्टाचं काम करत असतात. भूमिकेचा लूक, त्याचा बीभत्स आणि भीतीदायक वावर, कॅमेरा आणि व्हीएफएक्सच्या माध्यमातून साकारला जाणारा एकत्रित परिणाम अशी सगळी तारेवरची कसरत भुताचा मेकअप करणाऱ्या आर्टिस्टला करावी लागते. प्रत्येक भुतागणिक त्याच्या कामातही बदल होतो. म्हणजे स्त्री पात्र, पुरुष पात्र हे प्रमुख फरक तर असतातच. पण या व्यतिरिक्तही कामात तोचतोचपणा येऊ नये आणि भूमिकेतलं वैविध्य अधोरेखित व्हावं यासाठी अनेकदा वेगवेगळे प्रयोग त्यांना करावे लागतात. एखाद्या व्यक्तिरेखेसारखेच भूत कसं दिसेल याचे डिझाईन्स करावे लागतात.

हे सगळं इथेच संपत नाही. उलट इथूनच त्याची सुरुवात होते. भूत नेमकं कसं दिसेल याची रेखाटनं काढल्यानंतर त्यानुसार काम सुरू केलं जातं. प्रोस्थेटिक म्हणजे कृत्रिम अवयव आणि काही आधुनिक साहित्याने मेकअप केला जातो. त्यात वेगवेगळे विग्ज, खोटी नखं, दात, मुखवटे, कॉन्टॅक्ट लेन्सेसपासून ते अगदी खऱ्या खुऱ्या वाटणाऱ्या मानवी अवयव किंवा रक्तापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. कधीकधी हे अवयव बनण्यासाठीच चार ते पाच दिवस लागतात. ते योग्य दिसतील असे तयार झाले नसतील तर पुन्हा घडवावे लागतात. त्यामुळे सगळं आयत्यावेळी सोडून चालत नाही. सगळ्याची पूर्वतयारी करावी लागते.

laal-ishq-on-tv-2

हे सगळं पार पडलं तरी मनात आलं, चित्र रेखाटलं आणि मेकअप केला असं साधं सोपं नसतं. तो मेकअप टप्प्याटप्प्याने नीट केला जातो. प्रोस्थेटिक अवयव कलाकार अंगावर नीट वागवू शकतोय की नाही, तो अवयव चिकटवल्यानंतर कलाकाराला भूत साकारण्यासाठी काही अडचण तर येत नाही ना इथपर्यंत साऱ्याचं भान मेकअप आर्टिस्टना ठेवावं लागतं. कलाकार भुताच्या वेशाचं वजन उचलू शकेल का, त्याच्यासाठी आव्हानात्मक वाटणारी ही गोष्ट आणखी कशी सोपी करता येईल याची काळजीही मेकअपदादा घेत असतात. कलाकार प्रत्यक्ष मेकअपला बसला की त्याच्या चेहऱ्यावर ठरल्यानुसार मेकअप करणं हे खूप वेळखाऊ काम असतं. काही तास या मेकअपसाठी लागतात. त्यामुळे तितका संयम ठेवून आर्टिस्टना मेकअप करावा लागतो. त्यानंतर चित्रीकरण होतं आणि पुढे संकलनावेळी त्यावर व्हीएफएक्सचे संस्कार केले जातात. मग, त्यानंतर तयार झालेलं भूत प्रेक्षकाला घाबरवायला टीव्हीच्या पडद्यावर अवतरतं.

laal-ishq_creatures_collage

तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण 3 मे हा जागतिक पॅरानॉर्मल डे म्हणून साजरा केला जातो. थोडक्यात भुतांचा दिवस. आता भुतं आहेत की नाहीत, हा मुद्दा वादाचा असला तरी पडद्यावरची भुतं बघायला तमाम प्रेक्षकांना गंमत वाटतेच. त्यांची ही गंमत पुन्हा अनुभवण्यासाठी अँड टीव्हीवर गाजलेली लाल इश्क नावाची मालिका पुन्हा सादर होत आहे. दर शनिवारी आणि रविवारी ती रात्री दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत त्यांनी 230 वेगवेगळ्या प्रकारची भुतं पडद्यावर साकारली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या