इस्लामपूर नागरिकांसाठी ओपन जिमच्या माध्यमातून चांगली सुविधा – मंत्री जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस परेड ग्राऊंड इस्लामपूर येथील मैदानावर जायंटस् ग्रुप ऑफ इस्लामपूर व माणुसकीचं नातं यांनी एकत्र येत ओपन जिमची सुविधा निर्माण केली आहे. इस्लामपूर नागरिकांसाठी ही नवी व अतिशय चांगली व्यवस्था निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

पोलीस परेड ग्राऊंड इस्लामपूर येथील मैदानावर उभारण्यात आलेल्या ओपन जिमचे लोर्कापण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, जायंटस् ग्रुप चे दुष्यंत राजमाने, रणजित जाधव, ॲड. श्रीकांत पाटील, उद्योजक गिरीष चितळे, सर्जेराव यादव, डॉ. राजकुमार पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जायंटस् ग्रुप, माणुसकीचं नातं यांनी अतिशय कल्पकतेने ओपन जिमची सुविधा निर्माण केली आहे. कोरोनाच्या अनुषंगानेही त्यांनी अनेक कामे केली आहेत. अनेक गरजूंना मदत करीत आहेत. पोलीस दलानेही कोरोना काळात अतिशय चांगले काम केले असून कर्तव्याच्या बाहेर जाऊन माणुसकी दाखविण्याचे काम केले आहे. सामान्य माणसाला त्रास होऊ नये त्यांना मनमोकळेपणाने जगता यावे यासाठीही पोलीस दल चांगले काम करीत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, दुष्यंत राजमाने, गिरीष चितळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले. स्वागत रणजीत जाधव यांनी केले. श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.

तत्पूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील महादेवनगर व कापुसखेड रोड येथील घरकुलांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी नागरिकांच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, रेशनकार्ड आदींबाबत समस्या जाणून घेऊन संबंधितांना त्या सोडविण्यासाठी निर्देश दिले. यावेळी तहसिलदार रविंद्र सबनीस, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते.