राहुल गांधी यांच्या विरोधात माजी सनदी अधिकाऱ्यांचे खुले पत्र

देशातील 272 माजी सनदी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ खुले पत्र लिहिले आहे. ‘राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्ष देशातील घटनात्मक संस्थांची बदनामी करत आहेत,’ असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये 16 निवृत्त न्यायाधीश, 123 निवृत्त नोकरशहा, 14 माजी राजदूत आणि सैन्यातील 133 निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ‘देशाच्या लोकशाहीपुढे बाहेरचे नव्हे तर देशातील विषारी राजकारणाचे आव्हान आहे. राजकीय अपयश लपवण्यासाठी निवडणूक आयोगावर आरोप केले जात आहेत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

निर्लज्ज, सत्ताधाऱ्यांचे दलाल

काँग्रेस नेत्या अलका लाम्बा यांनी खुल्या पत्राचे वृत्त ‘एक्स’वर पोस्ट करत यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केवळ काही शब्द ट्विट केले आहेत. ‘निर्लज्ज, विकाऊ, भ्रष्ट, भित्रे, सत्तेचे दलाल’, असे त्यांनी म्हटले आहे.