ऑपरेशन बगदादी

1161

>>  प्रतीक राजूरकर

‘इसिस’ या कुख्यात दहशतवादी संघटनेसाठी 26 ऑक्टोबरचा दिवस कर्दनकाळ आणि संपूर्ण जगासाठी दिलासादायक ठरला. ‘इसिस’चा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी अबू बाकर अल बगदादी लपून बसलेल्या घरावर अमेरिकेच्या स्पेशल फोर्सच्या कमांडोंनी या दिवशी हल्ला केला. त्यावेळी सुटकेचा कुठलाही मार्ग न उरल्यामुळे बगदादीने स्वतःला आत्मघाती स्फोटकांच्या सहाय्याने उडवून घेतले आणि जागतिक दहशतवादाच्या इतिहासातील एक अत्यंत क्रूर आणि भयंकर रक्तरंजित काळ त्या घराच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्याखाली कायमचा दबला गेला. या यशस्वी ऑपरेशनमध्ये लष्करी कमांडोंबरोबरच एक ‘गुप्तहेर’ आणि एक ‘श्वान’ यांचेही योगदान महत्त्वाचे राहिले आहे.

‘इसिस’ या भयंकर आणि क्रूर दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बाकर अल बगदादी हा अखेर 26 ऑक्टोबर रोजी अमेरिकन स्पेशल कमांडोंच्या हल्ल्याचा ‘शिकार’ झाला. अल कायदाच्या लादेनला ज्या पद्धतीने अमेरिकन कमांडोंनी पाकिस्तानातील त्याच्या राहत्या घरात घुसून ठार केले होते. तसेच ऑपरेशन अमेरिकन कमांडोंनी सीरियात केले. बगदादी लपून बसलेल्या घरावर त्यांनी हल्ला केला आणि आपले ऑपरेशन यशस्वी केले. अर्थात हे केवळ एकटय़ा अमेरिकेचे यश नाही. त्यामागे सीरिया डेमॉक्रेटिक  फोर्ससह इराक आणि अन्य देशांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत महत्त्वाची ठरली आहे. शिवाय एक ‘गुप्तहेर’ आणि एक बेल्जियम मेलिनाइस प्रजातीचा एक ‘श्वान’ यांचेही योगदान निर्णायक ठरले. पाच महिन्यांपासून ही संपूर्ण मोहीम सुरू होती.

तुर्की सीमेपासून काही अंतरावर बगदादी वास्तव्यास होता. त्या ठिकाणी अमेरिकन कमांडोंनी हल्ला केला. बगदादी स्वतःला वाचवण्यासाठी घराखालील भुयारात घुसला खरा, पण अमेरिकन कमांडो आणि त्यांच्यासोबत असलेला ‘श्वान’ यांच्या तावडीतून त्याची सुटका होणे शक्यच नव्हते. साहजिकच बगदादीने अखेरचा पर्याय स्वीकारला. आत्मघाती बॉम्बचे जाकीट त्याने परिधान केले आणि स्वतःला व सोबतच्या दोन लहान मुलांना उडवून घेतले. दोन-तीन तास चाललेली ही धुमश्चक्री बगदादी ठार झाल्याचे समजल्यानंतरच शांत झाली. या घटनेत बगदादीच्या दोन पत्नीसुद्धा ठार झाल्या आहेत. दोन अतिरेकी व 11 लहान मुले घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात सैन्याला यश प्राप्त झाले. बगदादीचे स्मारक उभे राहू नये म्हणून बगदादी लपून बसला होता ते ठिकाण सैन्याने पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकले.

गेली पाच वर्षे अमेरिका ‘इसिस’च्या या  म्होरक्याच्या शोधात होती. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बगदादी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या ‘रडार’वर होता. त्याचे सातत्याने निवासाचे ठिकाण बदलणे, अतिनिकटच्या सहकाऱयांसमवेतचा मर्यादित वावर यामुळे बगदादीसोबत निर्णायक लढाईला थोडा वेळ लागला. मात्र 26 ऑक्टोबर हा बगदादीचा शेवटचा दिवस ठरला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तर या ऑपरेशनला उपयोग झालाच, पण या कारवाईला निर्णायक स्वरूप आणले ते एका गुप्तहेराने व अमेरिकन सैन्यातील एका श्वानाने. तशी माहिती आता समोर आली आहे. सीरिया डेमॉक्रेटिक फोर्सने गुप्तहेराबाबत दावा केलेला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या श्वानाचा फोटो ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

सीरियन सैन्याचे कमांडर अबदी यांनी बगदादी मोहिमेतील गुप्तहेराबाबत माहिती दिल्याचे प्रकाशित झाले आहे. अबदी यांनी गुप्तहेराचे नाव गोपनीय ठेवून त्याच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. अनेक महिने बगदादीच्या प्रत्येक हालचालींवर गुप्तहेर बारीक लक्ष ठेवून होता. गुप्तहेर हा मूळचा अरब असून इसिसमध्ये त्याचे अनेक नातेवाईक कार्यरत असल्याची माहिती आहे. अबदींनी दिलेल्या माहितीनुसार गुप्तहेराच्या नातेवाईकांना इसिसकडून अयोग्य वागणूक मिळत होती. त्यामुळे गुप्तहेराने इसिसचा सूड घेण्याच्या उद्देशाने गुप्त माहिती देण्याचे निश्चित केले. इसिसच्या भवितव्याबाबत गुप्तहेर साशंक होता. ही संधी साधत त्याच्यावर गुप्त माहिती पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली.

हा गुप्तहेर बगदादीच्या सुरक्षेतील महत्त्वपूर्ण अधिकारी असल्याचा दावा अबदींनी केला आहे. बगदादीच्या सुरक्षित स्थळांची व बगदादी पुढे कुठे आश्रय घेईल याची माहिती गुप्तहेराकडून प्राप्त होत होती. 2004 मध्ये बगदादीला अटक झाली होती. त्यामुळे तेव्हाचे बगदादीचे डीएनएचे नमुने अमेरिकेकडे होते. परंतु बगदादी म्हणून ज्या व्यक्तीच्या मागावर अमेरिका होती तो बगदादीच असल्याची पुष्टी होणे गरजेचे होते. ते कामही गुप्तहेराने जमवून दिले. डीएनए जुळवण्यासाठी बगदादीचे अंतर्वस्त्र व रक्ताचे नमुने त्याने अमेरिकेला मिळवून दिले. त्याआधारे उत्तर सीरियातील घरात लपलेला बगदादीच आहे त्याची पुष्टी करण्यात आली. त्याची खात्री झाल्यानंतरच निर्णायक हल्ल्याचे नियोजन करण्यात आले आणि त्याची यशस्वी सांगता करण्यात आली.

बगदादी स्वतःच्या सुरक्षेबाबत प्रचंड ‘ऍलर्ट’ आणि गंभीर होता. अतिशय मर्यादित सुरक्षा रक्षकांच्या गराडय़ात बगदादी असायचा. संपर्काची कुठलीही उपकरणे तो वापरत नव्हता. तो वास्तव्यास असलेल्या ठिकाणी उपकरणांचा वापर अपवादात्मक परिस्थिती वगळता निषिद्ध होता. कुणाचे लक्ष जाऊ नये म्हणून त्याचे निवासस्थान अतिशय साधारण असायचे. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकन ‘कमांडों’ना पाच वर्षांचा कालावधी लागला. बगदादीचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक व निकटवर्तीय हेच त्याचे सुरक्षा कवच होते. बगदादीला भेटायला येणाऱ्या मोजक्या बाहेरच्या व्यक्तींमध्ये ‘त्या’ गुप्तहेराचीदेखील गणना होत होती. प्रकाशित बातमीनुसार बगदादीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला आता अमेरिकेने 25 दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. बगदादीवर हल्ला झाला त्यावेळी ‘गुप्तहेर’ घटनास्थळी उपस्थित होता. याबाबत अमेरिकेच्या आघाडीची वृत्तसंस्था ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दुजोरा दिला आहे. दोन दिवसांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी बगदादीची माहिती देणाऱया गुप्तहेराला त्याच्या कुटुंबीयांसमवेत अज्ञातस्थळी नेल्याचे बातमीत नमूद आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात गुप्तहेर खरंच होता की नव्हता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बगदादीबाबत महत्त्वाची माहिती दिल्याने जाहीर केलेल्या बक्षिसाची संपूर्ण अथवा काही रक्कम गुप्तहेराला मिळण्याची शक्यतासुद्धा वर्तविलेली आहे.

गुप्तहेराशिवाय बगदादीच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका पार पाडली ती बेल्जियम मेलिनाइस प्रजातीच्या श्वानाने. या प्रजातीचे श्वान आकाराने लहान असल्याने पॅराशूटच्या सहाय्याने अथवा विमानात ने-आण करणे सोयीचे होते. म्हणून जगभरात या प्रजातीच्या श्वानांचे महत्त्व वाढले आहे. अमेरिकन सैन्यात या श्वानांना त्यांना नियंत्रित करणाऱया व्यक्तीच्या पदाचा एक दर्जा वरचा दिला जातो. या श्वानाला बगदादीचा सुगावा लागल्याने त्याने त्याचा पाठलाग सुरू केला. बगदादीने घरातील विशेष तयार केलेल्या अंधारी भुयाराकडे धाव घेतली. मात्र जिवंत राहण्याचे सगळे पर्याय खुंटल्यावर अमेरिकन सैन्याच्या हाती लागू नये म्हणून स्वतःला बॉम्बने उडवून दिले. त्यात अमेरिकन सैन्यातील श्वानाला दुखापत झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. लादेनवर केलेल्या हल्ल्यातसुद्धा अमेरिकेच्या ‘नेव्ही सील’ या कमांडो पथकाने याच प्रजातीच्या श्वानाची मदत घेतली होती. श्वानाचे नाव सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामागचा हेतू सैन्यातील नेमकी कुठली तुकडी या मोहिमेत सहभागी होती हे उघड होऊ नये हा आहे.

‘इसिस’सारख्या क्रूर दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बाकर अल बगदादी याला ठार मारण्याची सैनिकी कारवाई याप्रकारे प्राणी आणि मनुष्यप्राण्याच्या सहभागामुळेच अंतिम उद्दिष्टय़ गाठू शकली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. प्राचीन काळापासून युद्धात केला जाणारा गुप्तहेर प्राण्यांचा उपयोग सर्वश्रुत आहे. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या सध्याच्या काळातसुद्धा युद्धात प्राणी आणि मनुष्यप्राण्यांचे महत्त्व मोठेच आहे हे बगदादी प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या