‘ऑपरेशन सिंदूर’ बुद्धिबळासारखे लढलो, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे विधान

‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला 90 मिनिटांत गुडघ्यावर आणले, युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान गयावया करत होता असे दावे मोदी सरकारकडून केले जात असताना देशाचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी आज वेगळेच वास्तव मांडले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये विजय शेवटी हिंदुस्थानचाच झाला, पण हा संघर्ष बुद्धिबळासारखा होता. सैन्याचा कस लागला,’ असे द्विवेदी म्हणाले.

आयआयटी मद्रास येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ’ऑपरेशन सिंदूर’ हाणून पाडल्याचे पाकिस्तान भासवत असला तरी ते खरे नाही. पाकिस्तानला आम्ही मात दिली, असे द्विवेदी म्हणाले. ’हे युद्ध आतापर्यंतच्या पारंपरिक युद्धांपेक्षा वेगळे होते. आम्ही शत्रूच्या पुढच्या चालींबद्दल अंधारात होतो. शत्रूलाही आमच्या चालींचा अंदाज येत नव्हता. काही वेळा आम्ही त्यांना चेकमेट करत होतो, तर कधी धोका पत्करून त्यांना मारण्यासाठी जात होतो. हा आयुष्याचा भाग आहे. मात्र निर्णायक चेकमट आम्हीच दिला आणि विजय मिळवला, असे उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूरचे ध्येय ठरलेले होते, आदेश स्पष्ट होते आणि लष्कराला पूर्ण मोकळीकही होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाकिस्तान्याला विचारा, जिंकलात की हरलात?

पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हच्या धोरणावर त्यांनी टीका केली. ’फेक नरेटिव्ह हे नेहमी माणसाच्या डोक्यात तयार केले जाते. पाकने तेच केले आहे. तुम्ही एखाद्या पाकिस्तानी माणसाला विचाराल की तुम्ही या युद्धात जिंकला की हरला? तर तो असीम मुनीर यांच्याकडे बोट दाखवेल. असीम मुनीर यांना फाइव्ह स्टार मिळालेत, ते फिल्ड मार्शल झालेत म्हणजे आम्ही नक्कीच जिंकलो असणार असेच तो म्हणेल, याकडे द्विवेदी यांनी लक्ष वेधले.