प्रश्न मोदींना, उत्तर त्यांनीच द्यायला हवे! राज्यसभेत वादळी चर्चा, पंतप्रधानांनी पळ काढला!

पहलगाम हल्ला व ऑपरेशन ‘सिंदूर’वरून लोकसभेनंतर आज राज्यसभेत विरोधकांचे वादळ घोंगावले. चर्चेला उत्तर देण्यास ’पंतप्रधानांना बोलवा’ असा आग्रह विरोधकांनी धरला. त्यावरून मल्लिकार्जुन खरगे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. वारंवार मागणी करूनही पंतप्रधान सभागृहात न आल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

राज्यसभेत आज ऑपरेशन ‘सिंदूर’वर चर्चा सुरू झाली. मात्र, पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांनी उपस्थित राहून प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे विरोधी बाकांवरील सदस्यांचे म्हणणे होते. त्यासाठी विरोधकांनी ‘पंतप्रधानांना बोलवा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. अमित शहा यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘पंतप्रधान त्यांच्या कार्यालयातच आहेत. तुम्ही आधी माझ्याशी बोला. ते आले तर तुम्हाला भारी पडेल. मी उत्तर देत असेन तर पंतप्रधानांनीच बोलावे असा आग्रह कशाला? असे अमित शहा म्हणाले.

पंतप्रधान सभागृहात नसतील तर हा राज्यसभेचा अपमान

शहा यांच्या या उत्तरानंतर खरगे यांनी विरोधी सदस्यांच्या बाजूने आवाज उठवला. ‘बहुतेक सदस्यांनी थेट नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे त्यांनीच द्यायला हवीत. तुम्ही उत्तरे देऊ शकत नाही असे आमचे म्हणणे नाही, पण पंतप्रधान संसद भवनात असतानाही ते सभागृहात येत नसतील तर हा राज्यसभेचा अपमान आहे, असे खरगे यांनी सुनावले. त्यानंतरही अमित शहा यांनीच भाषण सुरू ठेवल्याने संतापलेल्या विरोधकांनी सभात्याग केला.

18 तास काम करणारे दोन तास संसेदत बसत नाहीत! – संजय सिंह

पंतप्रधान 18 तास काम करतात, पण संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन तासही बसत नाहीत. मोदींना सभागृहाचे काहीच महत्त्व वाटत नाही का? आमची बडबड त्यांना ऐकायची नसते, मग किमान स्वतःचे लोक काय बोलतात ते तरी ऐकायला यायला हवं. राजनाथ सिंह इथे बकवास करतात का? त्यांचे तरी पंतप्रधानांनी ऐकायला हवे, असा टोला आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी हाणला.

कपिल सिब्बल यांचा मोठा आरोप

पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी 400 किलोमीटरवरून आले. हवाई तळापासून अवघ्या एक किलोमीटरवर हल्ला केला. मात्र सुरक्षा यंत्रणांना खबरही लागली नाही. हल्ल्याच्या काही दिवस आधीच अमित शहांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. तरीही हल्ला झाला, कारण शहांनी सुरक्षा बैठकीला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना बोलावलेच नव्हते, असा आरोप खासदार कपिल सिब्बल यांनी केला.

आत्मनिर्भरता काय कामाची? -जया बच्चन

‘संरक्षणमंत्री जोरजोरात सांगतात. आम्ही हे बनवतोय, ते बनवतोय. तोफा बनवतोय. पण या सगळ्यांचा फायदा काय? 25-26 माणसांना तुम्ही वाचवू शकत नाही, मग तुमची आत्मनिर्भरता काय कामाची? किमान माणुसकी असायला हवी, असा टोला खासदार जया बच्चन यांनी हाणला. ऑपरेशन सिंदूर वगैरे नावे देणारे लेखक ठेवल्याबद्दल जया बच्चन यांनी खोचक शब्दांत सरकारचे आभार मानले.