
आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केंद्र सरकारला पाकव्याप्त काश्मीर (POK) संदर्भात थेट सवाल केला. “जर आपण आज पीओके ताब्यात घेतले नाही, तर कधी घेणार?” असा आक्रमक प्रश्न त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्र सरकारला यांना विचारला.
गौरव गोगोई यांनी आपल्या भाषणात म्हटले, “राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आमचा हेतू युद्ध नव्हता. मी विचारतो, का नव्हता? तो असायलाच हवा. आमचा उद्देश जमीन ताब्यात घेण्याचा नव्हता, पण का नव्हता? पीओके आता घेणार नाही तर कधी घेणार?”
त्यांनी पुढे राफेल विमानांबाबतही प्रश्न उपस्थित केले. “देशात केवळ 35 राफेल विमाने आहेत. त्यापैकी काही पडली तर ही मोठी हानी आहे. आम्हाला सांगितले जाते की, जगातील सर्वोत्तम लढाऊ विमाने आपल्याकडे आहेत. मग सीडीएसला का म्हणावे लागले की, आपली विमाने रेंजमध्ये जाऊ शकत नाहीत आणि दूरवरूनच हल्ला करावा लागला? जवळून हल्ला का करता आला नाही, याची माहिती द्या.”
गौरव गोगोई यांनी पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही सरकारला धारेवर धरले. “पहलगामच्या बैसरनमध्ये पाच दहशतवादी कसे घुसले? त्यांनी 26 जणांना गोळ्या झाडून ठार केले. सरकारने याबाबत काय माहिती दिली? त्यांचा उद्देश जम्मू-कश्मीरची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे होता. 100 दिवस उलटूनही सरकारला या दहशतवाद्यांचा शोध लागला नाही. त्यांना पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? याची उत्तरे सरकारकडे नाहीत,” असे त्यांनी ठणकावले.