
अकरावी सीईटीच्या ऑनलाइन अर्जातील चुका दुरुस्तीची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 2 ऑगस्ट रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत ऑनलाइन अर्जातील चुका दुरुस्त करता येतील.
ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, परीक्षेचे माध्यम, सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयांच्या प्रश्नांचे माध्यम, निवासस्थानाचा पत्ता, परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा, विभाग, एसईबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्ग याची माहिती भरताना काही चुका झाल्या असल्यास त्यात विद्यार्थ्यांना बदल करता येणार आहे.
अर्जात बदल करण्यासाठी विद्याथर्थ्यांना वेबसाईटवर जाऊन ऑप्लिकेशन क्रमांक आणि संगणक प्रणालीमध्ये टाकलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगीन करता येईल. अर्ज दुरुस्तीसाठी काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
एकच अर्ज ग्राह्य धरणार
काही विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांचा केवळ एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. जादाचे अर्ज विद्यार्थ्यांनी डिलीट करावे. अर्ज डिलीट करण्याची सुविधा 1 ऑगस्ट सकाळी 11 वाजल्यापासून आहे.

























































