मराठ्यांना ओबीसी वर्गात आरक्षणास विरोध; चंद्रपुरात ओबीसींचा मोर्चा

मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये आणि बिहारच्या धर्तीवर ओबीसी जनगणना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी रविवारी चंद्रपुरात ओबीसी बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तावडे मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात जिल्ह्यातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. विविध राजकीय पक्षांचे नेतेही यावेळी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप नेते आशीष देशमुख, आमदार परिणय फुके या मोर्च्यात उफस्थित होते. गांधी चौकातून दुपारी 1 वाजता हा मोर्च्याला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन थांबवण्यात आले आणि मान्यवरांची भाषणे झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. चंद्रपुरात आठ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. कोणतेही राजकीय स्वरूप येऊ न देता ओबीसी महामोर्चा यशस्वी झाल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी सांगितले. तसेच याबाबत समाधान व्यक्त केले.