आरोग्य खात्याचे आरोग्य बिघडले, मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या आरोग्य विभागावर आज विधानसभेत नामुष्की ओढवली. गडचिरोली, बुलढाणा येथील दोन महिलांच्या मृत्यूवरून विरोधकांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर आरोग्य विभागावरील विविध प्रश्नांच्या लेखी उत्तरात आरोग्य विभाग पूर्णपणे ‘फेल’ झाल्याचे दिसून आले. यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना धारेवर धरले.

गडचिरोली व बुलढाणा येथील जिल्हा स्त्र्ााr रुग्णालयात प्रसूती दरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात काँग्रेसचे सुनील केदार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य  मंत्री  डॉ. तानाजी सावंत यांनी प्रसूती दरम्यान झालेल्या महिला मृत्यूची विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल 15 दिवसांत घेण्यात येईल, असे जाहीर केले. याशिवाय प्रत्येक जिह्यात बैठक घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्र्यांच्या या उत्तरावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार संतप्त झाले. आरोग्य खात्याची चौकशी हा फार्स आहे. आरोग्य मंत्री हे निविदा आणि रुग्णालयाच्या खासगीकरणात गुंतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी घेऊन मंत्र्यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत विरोधकांनी सभात्याग केला.

गुजरातमध्ये उपचारांची वेळ

आदिवासीबहुल पालघर जिह्यात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा व पुरेशा संख्येत रुग्णालय नसल्याने रुग्णांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होत असून त्यांना उपचारांसाठी बाजूच्या राज्यात जावे लागते काय, असा प्रश्न विनोद निकोले यांनी केला होता. त्यावरील लेखी उत्तरात अत्यवस्थ रुग्णांना मुंबई, ठाणे, नाशिक व गुजरातमधील वापी व सिल्व्हासा येथे पाठवण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

45 ट्रॉमा केअर सेंटर बंद

राज्यातील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 108 ट्रॉमा केअर सेंटर्सना मंजुरी देण्यात आली होती.  45 ट्रॉमा केअर सेंटर्स विविध कारणांमुळे प्रलंबित असल्याचे तानाजी सावंत  यांनी म्हटले आहे. याबाबत आशीष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

‘आमची मुलगी’ वेबसाईट बंद

राज्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध  कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लिंगनिदान करणारी सोनोग्राफी करणारी सोनोग्राफी पेंद्रे व डॉक्टरांची तक्रार करण्यासाठी शासनाने सुरू केलेली ‘आमची मुलगी’ ही वेबसाईट 2019पासून बंद असल्याचे निदर्शनास आल्याबाबत आमदार संजय पोतनीस, रमेश कोरगावकर, राजन साळवी आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात ‘आमची मुलगी’ या वेबसाईटला  युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड या संस्थेकडून मिळणारे आर्थिक सहाय्य 2019पासून बंद झाले आहे. ही संस्थाही बंद झाल्याने वेबसाईट सुरू ठेवण्यासाठी निधी देता आलेला नाही, असे आरोग्य मंत्र्यांनी लेखी उत्तरात मान्य केले आहे.