
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्यास केलेला मज्जाव आणि सातत्याने सरकार धार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाची नोटीस आज लोकसभा सचिवालयाला देण्यात आली.
अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षातील 118 खासदारांच्या सह्या आहेत. घटनेच्या कलम 94 क नुसार सभापतींना पदावरून हटविण्यासाठी कमीत कमी 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. ही नोटीस मिळाल्यानंतर अध्यक्षांना सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषविता येत नाही. त्यानुसार अविश्वास प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत सभागृहात न येण्याचा निर्णय ओम बिर्ला यांनी घेतला आहे.


























































