
ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने आपल्या ग्राहकांना ऐन सणासुदीत जोरदार झटका दिला आहे. झोमॅटो कंपनीने प्लॅटफॉर्म शुल्कात 20 टक्के वाढ केली आहे. याआधी झोमॅटोच्या प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करण्यासाठी 10 रुपये शुल्क द्यावे लागत होते, परंतु यापुढे 12 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. देशातील संपूर्ण शहरात नवीन शुल्क लागू करण्यात आले आहे. ऐन सणासुदीत झोमॅटोने दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. त्यानंतर नवरात्र आणि दिवाळी यासारखे मोठे सण येणार आहेत. या सणासुदीत हजारो लोक झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करतात. या काळात झोमॅटोच्या ऑर्डरची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीला तिच्या डिलिव्हरी सिस्टम, कर्मचाऱ्यांवर आणि तांत्रिक संसाधनांवर अतिरिक्त खर्च करावा लागतो. हा खर्च संतुलित करण्यासाठी पंपनीने प्लॅटफॉर्म शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने हे पहिल्यांदा शुल्क वाढवले नाही. याआधीही वेळोवेळी शुल्कात वाढ केली आहे. याआधी ऑर्डर करण्यासाठी 6 रुपये शुल्क आकारले जात होते. त्यानंतर कंपनीने यात वाढ करून 10 रुपये केले, परंतु या वेळी शुल्कात 20 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरसाठी 12 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. गेल्या महिन्यात ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने शुल्कात दोन रुपयांची वाढ केली होती. स्विगीवरून ऑर्डर करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना 14 रुपये प्लॅटफॉर्म फी भरावी लागते. स्विगीनंतर झोमॅटोनेही फी वाढवल्याने आता ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे महाग झाले आहे.