कोरोनामुळे पालकांचे छत्र गमावले, ‘त्या’ मुलांना सोशल मीडियाने दिला आधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर रक्ताचे नातेवाईकदेखील पारखे होतात. अशा परिस्थितीत कोरोनामुळे गोकुळ आणि जयमाला माकडे या दांपत्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची मुले प्राजक्ता आणि चैतन्य निराधार झाले. मुलांची ही स्थिती वाणी समाजातील काही संवेदनशील समाजसेवकांना अस्वस्थ करून गेली. त्यासाठी राजेंद्र चितोडकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी सोशल मीडियाचा आधार घेतला.  त्यातून माकडे दांपत्याच्या मुलांसाठी तब्बल बारा लाख रुपये जमा झाले. वाणी समाजाचा हा उपक्रम आदर्शवत असून असंवेदनशील वातावरणात माणुसकी आणि सहवेदना जिवंत असल्याचे  उत्तम उदाहरण आहे.

धुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. उपचारासाठी दाखल झालेल्यांपैकी अल्पावधीत अनेकांचे मृत्यू झाले. त्यात गोकुळ माकडे आणि त्यांची पत्नी जयमाला माकडे यांचा समावेश आहे. धुळे शहरातील एका सहकारी पतसंस्थेत माकडे दांपत्य दैनिक ठेवी जमा करण्याचे काम करीत असत. कोरोनाची बाधा झाल्यामुळे दोघेही उपचारासाठी दाखल झाले, परंतु कोरोनाशी असलेला त्यांचा संघर्ष यशस्वी झाला नाही. काही अंतराने पती-पत्नींचा मृत्यू झाला. त्यामुळे शालेय शिक्षण घेत असलेली त्यांची मुले प्राजक्ता आणि चैतन्य निराधार झाले. त्यानंतर या अनाथ मुलांना मामा जगदीश बागड यांनी छत्रछाया निर्माण केली.

दरम्यान, मुलांची ही स्थिती वाणी समाजातील काही संवेदनशील समाजसेवकांना अस्वस्थ करून गेली. त्यासाठी राजेंद्र चितोडकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. माकडे दांपत्याचा करुण मृत्यू आणि अनाथ झालेल्या मुलांविषयी माहिती दिली. मुलांच्या भवितव्यासाठी शक्य असेल तितकी मदत करा, असे आवाहन केले. त्यासाठी मुलांचेच बँकेचे खाते देण्यात आले. अवघ्या काही दिवसांत या बँक खात्यांमध्ये बारा लाखांचा निधी जमा झाला. त्यामुळे आता या मुलांना काही काळ धीर मिळेल, असे मत राजेंद्र चितोडकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी चितोडकर यांच्यासोबत वाणी समाजातील मोहन येवले, दिलीप पाखले, गजानन कोतकर, नाना वाणी, दिगंबर सोनजे, मुकेश पिंगळे यांनी योगदान दिले.

कर्ज फेडण्याची जबाबदारी आमच्यावर

घरबांधणीसाठी आईवडिलांनी कर्ज घेतले होते. त्यामुळे वडिलांसोबत आईदेखील कष्ट करून वाटचाल करीत होती, पण कोरोनामुळे 23 एप्रिलला वडील आणि 24 एप्रिलला आईचा मृत्यू झाला. त्यामुळे साडेसात लाखांची परतफेड करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. आमची आर्थिक परिस्थिती सामान्य आहे. त्यामुळे भविष्याचा प्रश्न आहे.  – प्राजक्ता माकडे, मुलगी

समाजाने उभारलेल्या निधीतून अनाथ झालेल्या मुलांच्या डोक्यावरील कर्जाचा बोझा हटविला जाईल, परंतु मुलांच्या भविष्याची चिंता कायम आहे. वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाने आता या मुलांच्या भवितव्यासाठी भरभक्कम मदत केली पाहिजे.  – जगदीश बागड, मुलांचे मामा