32 लाखांचे घडय़ाळ, दीड लाखाचा ड्रेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया ऑस्कर पुरस्कार सोहळय़ाची नामांकन यादी बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, गायक निक जोनास यांनी व्हर्च्युअली जाहीर केली. नेटफ्लिक्सच्या ‘मँक’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह दहा नामांकने मिळाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, पुरस्कार सोहळय़ाच्या 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला दिग्दर्शकांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात नामांकन मिळाली आली आहेत.

सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी यंदा आठ चित्रपटांमध्ये चुरस असून त्यात ‘मँक’, ‘द फादर’, ‘जुडास अॅण्ड द ब्लॅक मसीहा’, ‘मिनारी’, ‘नोमाडलँड’, ‘प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘साऊंड ऑफ मेटल’ आणि ‘द ट्रायल ऑफ द शिकागो 7’ यांचा समावेश आहे. प्रियांका चोप्रा, राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांच्या ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटाला अॅडॅप्टेड स्क्रीनप्ले या विभागात नामांकन मिळाले आहे. दरवर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळा फेब्रुवारी महिन्यात पार पडतो. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे हा सोहळा 25 एप्रिलला पार पडणार आहे.

ऑस्करची नामांकन यादी जाहीर करतेवळी प्रियांकाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. या सोहळ्यासाठी प्रियांकाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. याची किंमत जवळपास 1 लाख 70 हजार रुपये होती.  ड्रेसला साजेसे निळ्या रंगाचे डिझायनर घडय़ाळ तिने घातले होते. या घडय़ाळाची किंमत तब्बल 32 लाख रुपये इतकी आहे.