ऍण्ड द ऑस्कर गोज टू…‘नोमाडलँड’ने मारली बाजी;  अँथनी हॉपकिन्स, फ्रान्सिस मॅकडॉर्मंड सर्वेत्कृष्ट कलाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया 93 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नोमाडलँड’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटासाठी फ्रान्सिस मॅकडॉर्मंड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर क्लोई चाओ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत. ऑस्करच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावणाऱया जाओ दुसऱया महिला दिग्दर्शिका ठरल्या आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘द फादर’ चित्रपटासाठी अँथनी हॉपकिन्स यांनी पटकावला आहे.  

  • ज्येष्ठ अभिनेत्री यून यू जंग यांना ‘मिनारी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरियन अभिनेत्रीला ऑस्कर मिळाला आहे.
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात ‘द फादर’, ‘जुडास अॅण्ड द ब्लॅक मसीहा’, ‘मँक’, ‘मिनारी’, ‘नोमाडलँड’, ‘प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘साऊंड ऑफ मेटल’, ‘द ट्रायल ऑफ द शिकागो’ या सात चित्रपटांमध्ये चुरस होती. मॅकला सर्वाधिक दहा नामांकने होती. तरीही केवळ सहा नामांकने असलेल्या ‘नोमाडलँड’ने ऑस्करमध्ये बाजी मारली आहे.

ना सूत्रसंचालन, ना प्रेक्षक

दरवर्षी हा सोहळा फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला जातो. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे हा सोहळा दोन महिने उशिरा पार पडला. लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटर आणि युनियन स्टेशन येथे पार पडलेल्या या  सोहळ्यात ना सूत्रसंचालक होते ना प्रेक्षक.

इरफान खान, भानू  अथय्या यांची आठवण

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील मेमोरियम या सेक्शनमध्ये बॉलीवूड अभिनेते इरफान खान, वेशभूषाकार भानू अथय्या यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱया भानू या पहिल्या महिला आहेत. 1982 साली ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता. ऋषी कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांनादेखील श्रद्धांजली वाहण्यात आली.

यांनी पटकावला पुरस्कार

सर्वोत्कृष्ट गीत – फाईट फॉर यू (जुडास अॅण्ड द ब्लॅक मसिहा), सर्वोत्कृष्ट संगीत – सोल,  सर्वोत्कृष्ट एडिटिंग – साऊंड ऑफ मेटल, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – मँक, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – मँक, सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स – टिनेट, सर्वोत्कृष्ट ध्वनी – साऊंड ऑफ मेटल, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – डॅनियल कलुया (जुडास अँड द ब्लॅक मसिहा).