
धाराशीव जिल्हा पोलीस अधिक्षकासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारुन पंधरा दिवस झाले तरी वेबसाईटवर मात्र जुनीच माहिती दिसत आहे. ल्हा पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक बी. एस. पालवे, धाराशिवचे विभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांच्यासह जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या होऊन त्याजागी नवीन अधिकारी रुजू झाले आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून नीवा जैन तर अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून नवीन कॉवत यांनी 21 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे.
मात्र, जिल्हा पोलिस दलाच्या संकेतस्थळावर मात्र अजून जुन्याच अधिकाऱयांची नावे व फोटो दिसून येत आहेत. जिल्हा पोलिस दलाची ही बेवसाईट 4 ऑगस्ट 2021 रोजी शेवटची अपडेट करण्यात आली होती. त्यानंतर ही वेबसाईट अपडेट करण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता जिल्हा पोलिस अधिक्षक हे जिल्ह्यातील सर्वोच्च पद आहे, त्यांच्या बदलीनंतर या संदर्भातील ’अपडेट’ वेबसाईटवर करणे गरजेचे आहे, मात्र आज तब्बल पंधरा दिवस झाले तरी बदल करण्यात आलेला नाही. एवढेच नाही तर सध्याच्या वेबसाईट मध्ये जे अधिकारी दाखवत आहेत किंवा माहिती आहे, ती जुनी असल्याने नागरीकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे.
पोलिस विभाग लोकाभिमुख व्हावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. नागरीकांना पोलिस स्टेशनला न जाता त्यांना ऑनलाईन सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाच्या वेबसाईटवरुन नागरीकांसाठी ई – तक्रार, भाडेकरुची माहिती, मोबाईल गहाळ फॉर्म यासह अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच पोलिस भरती, कोरोना काळात प्रवाशांना ई – पास आदी साठी नागरीकांना याच वेबसाईटचा वापर करावा लागतो. तसेच या वेबसाईटवर अधिकाऱयांचे संपर्क क्रमांक, ई – मेल आयडी आदीचा तपाशील आहे.
लवकरच पुर्ण वेबसाईट बदलणार – नवनित कॉवत
या संदर्भात माहिती घेण्यासाठी अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या सर्व कर्मचारी हे तुळजापूर येथील यात्रा नियोजनाच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे वेबसाईट अपडेट झालेली नाही. मी स्वत: कॉम्युटर इंजिनियर आहे. त्यामुळे लवकरच पुर्ण वेबसाईट बदलून ही नव्या रुपात आणणार आहेत.































































