ओटीटीमुळे सिनेमांवरील ‘फ्लॉप’चा शिक्का मिटला; ना प्रेक्षकांची चिंता, ना नुकसानीची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीकडच्या काळात कोणताही सिनेमा मल्टीप्लेक्स किंवा थिएटरमध्ये झळकला की काही दिवसांतच त्याला तिथून हटवायची वेळ येते. त्यामुळे त्या सिनेमांवर फ्लॉपचा शिक्का मारला जातो. ओटीटी प्लॅटफॉर्मने मात्र सिनेमांवरील फ्लॉपचा शिक्का पुसण्याचे काम केले आहे. ना प्रेक्षकांची चिंता, ना नुकसान होण्याची भीती. त्यामुळेच छोटय़ा बजेटच्या सिनेमांसाठी ओटीटी वरदान ठरलं आहे.

कोरोना काळात 60हून अधिक सिनेमा थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे यातील कोणत्याही सिनेमावर ‘फ्लॉप’चा टॅग लागलेला नाही. सर्व सिनेमांनी खर्चापेक्षा अधिक मिळकत केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म कधी आपला सिनेमा किती जणांनी बघितला ही माहिती सार्वजनिक करत नाही. त्यामुळे सिनेमा फ्लॉप झाला की हिट झाला हे कळणं तसं कठीण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म सिनेमांचे हक्क मोठी किंमत देऊन विकत घेतात. त्यामुळे निर्मात्यांचे नुकसान होत नाही.

थिएटरपेक्षा अधिक सुरक्षित…

सिनेमा बघायला प्रेक्षक आलेच नाही तर… थिएट्रीकल रिलीजमध्ये ही जोखीम असते. ओटीटीवर हा धोका नसतो. म्हणजे ओटीटी रिलीजमध्ये निर्माता सुरक्षित असतो, असे दिग्दर्शक अविनाश दास भास्कर यांनी सांगितले. आमचा ‘अनारकली ऑफ आरा’ सिनेमा कुणी प्रदर्शित करायला तयार नव्हता म्हणून पीव्हीआरसोबत भागीदारी करून आम्ही स्वतŠ सिनेमा प्रदर्शित केला. मात्र तो चालला नाही, याकडे अविनाश दास यांनी लक्ष वेधले.

हे सिनेमा बचावले

नेटफ्लिक्सवर अलीकडेच अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांचा ‘सरदार का ग्रँडसन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या सर्व समीक्षणावरून असं दिसतंय की, थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला असता तर तो फ्लॉप ठरला असता. अभिषेक बच्चनची बिग बुल आणि अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ हे सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर काही फारसा चमत्कार करू शकले नसते. संजय दत्त आणि आलिया भटचा ‘सडक-2’ सिनेमाला आयएमडीबीवर 1.1 रेटिंग होते. मात्र ओटीटीमुळे हा सिनेमा फ्लॉप होण्यापासून वाचला. थोडक्यात ओटीटीमुळे काही सिनेमा फ्लॉप होण्यापासून बचावले आहेत.